छत्रपती संभाजीनगर : मुंबईनंतर राज्याचं लक्ष लागलेल्या छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) महापालिकेत अखेर आज सत्तास्थापन होत असून महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीही जाहीर होणार आहेत. मात्र, येथील उपमहापौर पदाच्या निवडीवरुन शिवसेना नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाठ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर, पालकमंत्री संजय शिरसाठ समर्थक नगरसेवकांनी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतल्याने शिरसाठ यांची नाराजी संपुष्टात आल्याचे दिसून येते. उपमहापौर पदासाठी 3 नगरसेवक अर्ज भरणार होते. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कडक समज दिल्यानंतर शिवसेनेकडून (Shivsena) कुणीही अर्ज भरणार नसल्याचे स्पष्ट झाले. नाराज असलेल्या संजय शिरसाठ यांनीही राजेंद्र जंजाळ यांची उमेदवारी मान्य केल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. भाजपकडून महापौर पदासाठी समीर राजूरकर तर शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांचा अर्ज दाखल करण्यात आला. भाजपकडून यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तर, शिवसेना पक्ष कार्यालयाकडून छत्रपती संभाजीनगरमधील उपमहापौरपदासाठी पक्षादेश काढण्यात आला. त्यामध्ये, राजेंद्र जंजाळ हेच उपमहापौरपदाचे उमेदवार असतील, असे म्हटले आहे. त्यामुळे, उपमहापौर पदावरून शिवसेनेत पडलेल्या दोन गटावर अखेर एकमत झालं आहे. राजेंद्र जंजाळ यांचा अर्ज दाखल करतानाही संजय शिरसाठ यांची अनुपस्थिति असल्याने शिवसेनेतील दुफळी उघड झाली. 

महापौर आणि उपमापौरपदाच्या उमेदवारांचा अर्ज भरतेवेळी पालकमंत्री संजय शिरसाठ यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली. संजय शिरसाठ हे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या उपमहापौरपदाच्या नावावर राजी नाहीत अशी चर्चा होती. त्यामुळे शिवसेनेत नाराजीचं राजकारण दिसून आलं. मात्र, संजय शिरसाट हे नाराज नाहीत. काही कारणे असतील तर पालकमंत्री संजय शिरसाठ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बोलणे होईल, त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालकमंत्री ऐकतील, असे भाजप आमदार अतुल सावे यांनी म्हटले. 

Continues below advertisement

पालकमंत्री संजय शिरसाट नाराज नाहीत - जंजाळ

जिल्हा परिषद निवडणुका असल्यामुळे पालकमंत्री त्या कामात आहेत, त्यांना विश्वासात घेऊन आम्ही राजेंद्र जंजाळ यांचे नाव दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरूनच संपूर्ण प्रक्रिया पार पाडली असून संजय शिरसाठ नाराज नाहीत, त्यांच्यासोबत माझे बोलले झाले, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे समन्वयक विलास पारकर यांनी दिली. पालकमंत्री नाराज नाहीत शिवसेनेच्या इतर उमेदवारांनी महापौर पदासाठी अर्ज घेतले, त्यावेळेस माझे नाव घोषित झाले नव्हते. पालकमंत्री निवडणुकीच्या कामात आहेत, त्यामुळे येऊ शकले नाही. बाकी शिवसेनेच्या उमेदवारांनी घेतलेले अर्ज ते दाखल करणार नाहीत, तक्रार करण्याची गरज नाही. पक्षाचा आदेश आहे, शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे यांचा आदेश हा अंतिम असतो. आदेशावर चालणारी आमची संघटना आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया उपमहापौर पदाचे उमेदवार राजेंद्र जंजाळ यांनी दिली.

हेही वाचा

MNS : मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेनं एक स्वीकृत नगरसेवकपद आमच्यासाठी सोडावं, मनसेचा आग्रह; उद्धव ठाकरे काय करणार?