Shrikant Shinde Income Tax Notice: आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना आयकर खात्यानं नोटीस पाठवली, गदारोळ उडताच संजय शिरसाटांचा घूमजाव
Shrikant Shinde Income Tax Notice: खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाने नोटीस पाठवलीय, असं वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलेलं, पण आता त्यांनी असं काहीच झालं नाही, आपल्या तोंडी वाक्य घातलं गेलं, असं म्हणत घूमजाव केला आहे.

Shrikant Shinde Income Tax Notice: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपूत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना आयकर खात्याने नोटीस (Income Tax Notice) पाठवल्याची धक्कादायक माहिती संजय शिरसाटांनी माध्यमांसमोर दिली. त्यानंतर एकच गदारोळ उडाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा संजय शिरसाटांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आणि आपल्या तोंडी वाक्य घातलं गेलं, असं स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबईत (Mumbai News) सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन (State Legislature Session) सुरू आहे. मात्र, हे अधिवेशन सोडून एकनाथ शिंदे हे काल अचानक दिल्लीत (Delhi News) गेले होते. त्यांची ही दिल्लीवारी गुप्त होती. आज सकाळी याबाबतची माहिती समोर आली. दिल्लीत एकनाथ शिंदे यांना काही बडे नेते आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. अशातच संजय शिरसाटांनी श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस आल्याचं वक्तव्य केलं आणि एकच गदारोळ झाला. श्रीकांत शिंदे यांना आयकर खात्याची नोटीस आल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तेवढ्यात एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल झाले आणि काही वेळातच संजय शिरसाटांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं आणि आपलं वक्तव्य मागे घेतलं.
संजय शिरसाट स्पष्टीकरण देताना म्हणाले की, "मला आयकर विभागाची नोटीस आली, हे स्पष्ट केलं. मला काही पत्रकारांनी विचारलं श्रीकांत शिंदेंनासुद्धा नोटीस आली आहे का? तर मी म्हटलं श्रीकांत शिंदेंना सुद्धा जरी नोटीस आली असेल तर मला माहीत नाही. श्रीकांत शिंदे यांना नोटीस आली की नाही हे मला माहित नाही, हे वाक्य माझ्या तोंडी घातलं गेलं."
आधी संजय शिरसाट काय म्हणालेले?
शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनावधनाने याबाबतची माहिती सांगितली. संजय शिरसाट यांनी म्हटले की, आयकर विभाग हा प्रत्येकाची तपासणी करत असतो. मला नोटीस आली आहे, श्रीकांत शिंदे साहेबांना नोटीस आली आहे. आणखी कोणाला नोटीस येत असेल. त्यामुळे आम्ही आयकर विभागाला उत्तर द्यायला बांधील आहोत. मला 9 तारखेला उत्तर द्यायला सांगितले होते. मी त्यांच्याकडे वेळ मागून घेतला आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटलेलं.
संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर कार्यक्रमात आपल्याला आयकर खात्याची नोटीस आल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमधील विटस् हॉटेल लिलावात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. यामध्ये संजय शिरसाट यांचा मुलगा गुंतल्याचा आरोपही झाला होता. संजय शिरसाट यांनी हे सर्व आरोप फेटाळले असले तरी विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात उच्चस्तरीय समितीतर्फे चौकशीची घोषणा केली होती.
एकनाथ शिंदे गुपचूप दिल्लीत पोहोचले (Eknath Shinde in Delhi)
सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र, हे अधिवेशन सोडून एकनाथ शिंदे काल अचानक कोणालाही पत्ता लागून न देता दिल्लीत दाखल झाले होते. यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले होते. दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी भाजपचे बडे नेते आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. मात्र, शिंदेंची ही दिल्लीवारी कोणत्या कारणासाठी होती, हे कळू शकले नव्हते. मात्र, आता शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदे यांना आलेल्या आयकर विभागाच्या नोटीसमुळे तर एकनाथ शिंदेंनी तातडीने दिल्ली तर गाठली नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पाहा व्हिडीओ :





















