Beed Georai Crime : बीडच्या गेवराई येथे एका महाराजांना झालेल्या मारहाण प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माहिती घेतली. कीर्तनकार महाराजांना मारहाण करणाऱ्यांना बिलकुल सोडणार नाही. जे आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. मी वारकरी संप्रदायातील आहे. विठ्ठलाचा निस्सिम भक्त आहे. महाराष्ट्रात वारकऱ्यांवर , संतांवर कुठेही अन्याय होता कामा नये. सरकार तुमच्या बरोबर आहे. जी काही मदत लागेल, ती आम्ही करू. काळजी करू नका, बंदोबस्त करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंआहे. यावेळीत्यांनी मारहाण झालेल्या महाराजांना व्हिडिओ कॉलद्वारे संवादसाधतहाशब्ददिलाआहे. (Beed Georai Crime)
Georai Crime: कीर्तनकार कैलास महाराज आनंदे यांना गावगुंडांनी केली मारहाण
बीडच्या गेवराईमधील कीर्तनकार कैलास महाराज आनंदे यांना गेवराई शहराजवळ गावगुंडांनी मारहाण केली होती. यामध्ये त्यांचे दोन्ही हात फॅक्चर झाले आहेत. त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी कैलास महाराजांची भेट घेतली. तसेच यावेळी युवा शिवसेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या वतीने कैलास महाराज आनंदे यांच्या उपचाराची जबाबदारी घेण्यात आली. उपचाराचा खर्च सुपूर्द करण्यात आला.
Eknath Shinde : आरोपींचा बंदोबस्त केला जाईल, त्याची खबरदारी आम्ही घेतो
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे कैलास महाराज आनंदे यांची विचारपूस केली. तसेच सरकार आपल्या पाठीशी आहे. आरोपींचा बंदोबस्त केला जाईल, काळजी करू नका. महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यावर आणि संतावर कुठेही अन्याय होता कामा नये, त्याची खबरदारी आम्ही घेतो असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारला म्हणून गावातील गावगुंडांकडून अमानुष मारहाण (Beed Georai Crime)
बीडच्या गेवराई शहरात गावातीलच काही व्यक्तींनी कैलास महाराज आनंदे महाराजांना लोखंडी रॉड, लाकडी दांडे, केबल वायरच्या सहाय्याने अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आलीय. या मारहाणीचे सर्व चित्रण तेथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रीत झाले आहे. एका कीर्तनकार महाराजांवरच जीवघेणा हल्ला झाल्यानं परिसरात खळबळ उडालीय. कैलास आनंदे हे कीर्तनकार महाराज स्वानंद सेवा गुरुकुल चालवतात. गावातीलच काही व्यक्तींनी अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारल्याच्या कारणावरून वाद झाला होता. याच वादातून गावातील व्यक्तींनी महाराज आळंदीला जाताना जातेगाव रोडवर गाठून बेदम मारहाण केली. या मारहाणी मध्ये कीर्तनकार महाराज जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे कुटुंबातील सदस्य दहशतीत असून पोलीस अधीक्षकांनी घटनेची दखल घेऊन संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. मारहाण करताना हल्लेखोरांनी याचा संतोष देशमुख करून टाका असे म्हटल्याचा दावा मारहाण झालेल्या महाराजांनी केला. दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
