Eknath Shinde Dharashiv news: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रविवारी धाराशिव येथे पार पडलेल्या कार्यक्रमात काही लोकांनी गोंधळ घालण्याची योजना आखली होती, अशी माहिती समोर आली आहे. काही शिवसैनिक (Shivsena) एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) या कार्यक्रमात घोषणाबाजी करणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांना या सगळ्याचा सुगावा लागला आणि त्यांनी वेळीच पावलं उचलत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात गोंधळ घातला जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या गुप्त अहवालातून (Secret Report) समोर आली होती. एकनाथ शिंदे यांनी हा अहवाल पोलिसांकडून मागवून घेतल्याचे समजते. (Maharashtra Politics news)
प्राथमिक माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव येथील पत्रकार संघाच्या कार्यक्रमात काही शिवसैनिक घोषणाबाजी करणार होते. त्यांना तसे मेसेज पाठवण्यात आले होते. अन्याय झाला म्हणून भावनाविवश झालेल्या कार्यकर्त्यांच्या असंतोषाला खतपाणी घालून त्यांना घोषणाबाजी करण्यास चिथावणी देणे आणि शिवसेनेत फूट पाडायची, अशी योजना होती. एकनाथ शिंदे यांनी आता पोलिसांचा गोपनीय अहवाल मागवून घेतला आहे. यामध्ये कोणत्या शिवसैनिकांची नावं आहेत, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, हा अहवाल पाहिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात घोषणबाजी करण्यासाठी फूस लावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांनी काही शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवले होते. तर काही शिवसैनिकांना कार्यक्रमाला न जाण्याचा नोटिसा धाडण्यात आल्या होत्या. कार्यक्रमात गोंधळ होऊ शकतो या पोलिसांच्या गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई केल्याचे सांगितले जाते. कोणावर अन्याय झाला तर त्याला न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
Eknath Shinde news: खासदार ओमराजे निंबाळकरांचा सावध पवित्रा; एकनाथ शिंदेंसोबत कार्यक्रमात एकत्र येणं टाळलं
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती अलीकडेच समोर आली होती. या खासदारांनी ठाण्यात गुप्तपणे एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले होते. या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर होते, अशी चर्चा होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर रविवारी धाराशिव पत्रकार संघाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर एका व्यासपीठावर असतील, अशी माहिती समोर आली होती. मात्र, ओमराजे निंबाळकर यांनी शेवटच्या क्षणी या कार्यक्रमाला जाणे टाळले होते.
आणखी वाचा
ऑपरेशन टायगरची गरज नाही, आता साध्या गोळीवरही लोक माझ्याकडे येतात, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
