मुंबई : राज्यात आगामी काळात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसदर्भात शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीत लढवायच्या असल्याचं सांगितलं.  शिवसेनेच्या बैठकीला संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, उदय सामंत, शंभूराज देसाई, भरत गोगावले, योगेश कदम, गुलाबराव पाटील, प्रकाश अबिटकर हे मंत्री उपस्थित आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तपासण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. 

Continues below advertisement


एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात सर्व मंत्र्यांशी वन टू वन चर्चा करून त्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या. मंत्र्यांना  दिलेल्या मतदारसंघात फिरून स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी करण्याचे दिले काम एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. शिवसेनेचे मंत्री कोणकोणते मंत्री दिलेल्या मतदारसंघात फिरले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची किती तयारी केली, पक्ष संघटनेसाठी काय काय केले याची माहिती घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 


Eknath Shinde on Local Body Election : निवडणुका महायुती म्हणून लढायच्या


शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक नंदनवन या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना निवडणुका महायुतीतच लढायच्या ही भूमिका ठेवण्याचे आदेश दिले.  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यात महानगरपालिका देखील महायुतीमध्ये आपल्याला लढायच्या आहेत,असं एकनाथ शिंदे म्हणाले.  


अगदीच जिथे काही जुळून येत नसेल तिथे शेवटचा पर्याय म्हणून मैत्री पूर्ण लढत करू, अन्यथा सर्वत्र महायुतीच निवडणूक लढवू अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली.  एकनाथ शिंदे यांनी निवडणुका महायुतीत लढवण्याचा संदेश सर्व मंत्र्यांना नंदनवन या निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले.  या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सर्वांना एकत्रित मार्गदर्शन केले तसेच प्रत्येक मंत्र्याला दिलेल्या जबाबदारीचा आढावा घेतला.


दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी नुकताच नवी दिल्लीचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे नवी दिल्लीत असतानाच शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिका निवडणुकीत समसमान जागा लढवण्यासाठी आग्रही असल्याचं सांगण्यात आलं होतं. मुंबई महापालिकेत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना किती जागांवर लढणार हे पाहावं लागणार आहे. मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी महायुतीत कोणाला किती जागा मिळणार हे पाहावं लागेल.