Eknath Shinde Meets PM Narendra Modi: राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2026) सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दीड तास सखोल चर्चा केली. ही चर्चा सकाळी 11 ते 12,20 दरम्यान पार पडली. त्यानंतर 12:30 वाजता शिंदे यांनी संसदेचे सभापती ओम बिर्ला यांची देखील भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज संसदेत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांच्याशी भेट झाली आहे. खासदार श्रीकांत शिंदे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी रिजिजू यांनी एकनाथ शिंदे यांना 'श्रीकांत मेरा छोटा भाई है', असे म्हटले. त्यांच्या संभाषणाची आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Eknath Shinde Delhi Visit: एकनाथ शिंदे शिंदे यांचा दिल्ली दौरा
दरम्यान, एकनाथ शिंदे कालपासून दिल्लीत असून, मित्रपक्षांमधील समन्वय, निवडणुकांतील जागावाटप तसेच काही मतदारसंघांमध्ये शिवसेनेला मिळालेल्या अपुऱ्या सहकार्यामुळे झालेल्या पराभवाबाबतचा अंतर्गत अहवाल ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासमोर मांडण्याची शक्यता आहे. तसेच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली. ही बैठक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली होती. या बैठकीत अधिवेशनातील विविध कामकाज आणि पक्षाच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या खासदारांनी अर्थसंकल्पीय चर्चेत पक्षाची भूमिका कशी मांडायची यावर विचारविनिमय केला. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईचा आढावा घेण्यासाठी ते वकिलांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसही दिल्ली दौऱ्यावर जाणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते केंद्रीय संचलन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर तिकीट वाटपासंदर्भात भाजपच्या केंद्रीय स्तरावर पुन्हा खलबतं सुरू झाली आहेत. याआधीही निवडणुका जाहीर होण्यापूर्वी केंद्रीय संचलन समितीची बैठक पार पडली होती.
आणखी वाचा
