Eknath Shinde & Ravindra Dhangekar: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या (Jain Boarding house) जमीन विक्री व्यवहारावरुन भाजप खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर फटाक्याच्या माळ लावल्याप्रमाणे एकामागोमाग एक आरोपांची राळ उडवून देणारे शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आणि सूचक वक्तव्य केले. कोणत्याही कार्यकर्त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडता कामा नये. मी रवींद्र धंगेकर यांना काय पाठवायचा तो निरोप पाठवला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ते शनिवारी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Pune News)
यावेळी एकनाथ शिंदे यांना पुण्यात रवींद्र धंगेकर यांच्याकडून भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर सुरु असलेल्या आरोपांविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, माझ्याकडून रवींद्र धंगेकरांना माझ्याकडून निरोप गेला आहे. महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये. महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मी पुण्यात गेलो होतो तेव्हाही भाष्य केलं होतं, आजही करतो आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे. महायुतीमध्ये कुठे बेबनाव होईल, असे कृत्य वक्तव्य करु नये, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
यावर तुम्ही रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, रवींद्र धंगेकर यांच्याकडे पक्षाचा काय तो निरोप जायचा होता तो गेला आहे. धंगेकरांचं वक्तव्य आहे जे आहे, त्याबाबत मी त्यांच्याशी बोलेन. ते मला भेटतीलही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Eknath Shinde meets PM Modi: पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीत काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मोदींना संत तुकारामांची मूर्ती भेट म्हणून दिली. पंतप्रधान मोदी यांच्याशी राज्यात सुरू असलेल्या विकास कामांबाबत चर्चा झाली. त्यांनी काही प्रकल्पांबाबत विचारपूस केली. तसेच मोदीजींनी महायुतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचं कौतूक केलं. असंच काम यापुढेही सुरू ठेवा अशी सूचनाही त्यांनी केली . मुंबईत पॉड टॅक्सी सुरू करण्याबाबत प्रधानमंत्री आग्रही आहेत. त्याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री महोदयांनी दिली . या प्रकल्पाला चालना देण्याबाबत चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागाबाबत मोदीजींनी आस्थेने चौकशी केली. उपमुख्यमंत्री महोदयांनी या भागातल्या परिस्थितीबाबत अवगत केलं . केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मोदीजींनी दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आणखी वाचा