(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकलं, 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा, पहिल्या सभेचं ठिकाण ठरलं!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी दौरा जाहीर झाल्यानंतर, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (Eknath Shinde) मैदानात उतरले आहेत. कारण एकनाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी दौरा जाहीर झाल्यानंतर, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (Eknath Shinde) मैदानात उतरले आहेत. कारण एकनाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. येत्या मार्च महिन्यापासून आचारसंहिता लागेल. त्यामुळे आपल्या हातात 60 दिवसच उरले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
"येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2023) केवळ राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष केवळ आणि केवळ आपल्याकडे असेल. आपण बाळासाहेब ठाकरेंचा विचार जपण्यासाठी वेगळ पाऊल उचलून, महायुतीचं सरकार स्थापन केलं. त्यामुळे आपण या निवडणुकीत झोकून देऊन काम करायचं आहे. महायुतीचं टार्गेट 45 प्लस आहे, ते गाठण्यात काही अशक्य वाटत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक आज पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभेच्या दृष्टीने महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्या दौऱ्याच्या तयारीनिमित्त या बैठकीत चर्चा झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात येत्या 6 जानेवारीपासून होणार आहे. यवतमाळ, वाशिममध्ये आणि रामटेक इथं 6 जानेवारीला पदाधिकारी मेळावा होईल.
महायुती म्हणून ताकदीने लढा
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "ही जागा लढली, ती जागा सोडली अशा वेगवेगळ्या बातम्या मीडियातून, सोशल मीडियातून येतील. पण आपण 48 जागा महायुती म्हणून लढायचं आहे. चार राज्यात निवडणुका झाल्या, त्यावेळी मीडियाने, विरोधकांनी काय काय वर्तवलं होतं. पण सगळ्यांचे अंदाज फोल ठरले. तीन राज्यात भाजप पूर्ण बहुमताने निवडून आलं. त्यामुळे कुठली जागा गेली, कुठली आली हे डोक्यात ठेवू नका, आपल्याला 48 जागा लढून महायुती म्हणून जिंकायच्या आहेत"
एकनाथ शिंदे यांचा राज्यव्यापी दौरा कसा असेल?
६ जानेवारी यवतमाळ, वाशिममध्ये आणि रामटेक मेळावा
८ जानेवारी अमरावती आणि बुलढाणा
१० जानेवारी हिंगोली आणि धाराशीव
११ जानेवारी परभणी आणि संभाजीनगर
२१ जानेवारी शिरूर आणि माव़ळ
२४ जानेवारी रायगड रत्नागिरी सिधुदुर्ग
२५ जानेवारी शिर्डी आणि नाशिक
२९ कोल्हापूर ३० जानेवारी हातकंणगले
पक्षाचं दोन दिवसाचं शिबीर होणार आहे
राम मंदिर उद्घाटनाचीही तयारी
दरम्यान, या बैठकीत शिवसेनेकडून राम मंदिर उद्घाटनाचीही जंगी तयारी करण्याचं ठरवलं आहे. उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, "२१ आणि २२ जानेवारीला राम मंदिराचा उत्सव रत्नागिरीत साजरा होणार आहे. जिल्ह्यातील राम मंदिर आणि ग्राम मंदिरांमध्ये महाप्रसाद, रोषणाई करण्यात येणार आहे. राम मंदिर उद्घाटनादिवशी ११ ते १ लाईव्ह कार्यक्रम ग्रामस्थांना दाखवला जाणार, ४ हजार ६०० ग्रामदैवतांची देवळं आहेत त्या मंदिरांना रोषणाई व महाप्रसाद ठेवला जाणार आहे. याच पद्धतीनं कार्यक्रम महाराष्ट्रभर राबवावा, अशी विनंती उदय सामंत यांनी केली.