मुंबई : शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संवेदनशीलपणाची अनेक उदाहरणे ते मुख्यमंत्री असताना पाहायला मिळाली. तसेच, वैद्यकीय क्षेत्रात ते सातत्याने सर्वसामान्यांच्या मदतीसाठी पुढे येत असतात. शुक्रवारी जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपला संवेदनशीलपणा दाखवत लाडक्या बहिणीला मदत केलीय. एकनाथ शिंदे शुक्रवारी मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आले होते. तिथून मुंबईकडे (Mumbai) परतत असताना विमानतळावर आल्यानंतर त्यांच्या उड्डाणाला थोडा विलंब झाला. मात्र हाच विलंब एका मायभगिनीसाठी जीवनदान देणारा ठरला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील शीतलताई बोरडे या किडनी विकाराने त्रस्त असलेल्या भगिनी किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठीच विमानाने पतीसह मुंबईकडे निघाल्या होत्या. मात्र, त्यांचे विमान चुकले. ही बाब मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदेंच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर, शिंदेंनी तात्काळ होकार दिला आणि या भगिनीला आणि तिच्या पतीला आपल्या चार्टर्ड विमानातून मुंबईला आणले. यावेळी प्रवासात एकनाथ शिंदेंनी त्यांची आस्थेने चौकशीही केली. इतकेच नाही तर मुंबईत आल्यावर त्यांच्यासाठी विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करून देत या भगिनीला रुग्णालयातही दाखल केले. यावेळी लाडक्या बहिणीने एकनाथ शिंदेंचे आभारही मानले. एकनाथ शिंदे जर वेळेत मदतीला धावून आले नसते तर भगिनीची शस्त्रक्रिया वेळेत होऊ शकली नसती. लाडक्या बहि‍णींचं हे सरकार असल्याचे सांगणारे एकनाथ शिंदे एका भावाप्रमाणे बहिणीच्या मदतीसाठी पुढे सरसावल्याने बोरडे कुटुंबीयांनी आनंद व आभार व्यक्त केले.

मातीशी जुळलेलं नातं आणि माणुसकीचं बाळकडू अशा दुहेरी गुणांचं अनोखं मिश्रण एकनाथ शिंदेंच्या व्यक्तिमत्वात आहे. त्यामुळेच, ते सदैव प्रत्येकाच्या मदतीसाठी तत्पर असतात, याची प्रचिती पुन्हा एकदा विमानप्रवासातून महाराष्ट्राला आली. दरम्यान, यापूर्वीही एका पुण्यातील रुग्णासाठी एकनाथ शिंदेंनी चक्क प्रायव्हेट जेट पाठवल्याचं पाहायला मिळालं होतं. 

एकनाथ शिंदेंचा रिक्षातून प्रवास

कार्यकर्ते असोत किंवा लाडक्या बहिणी, त्यांचा आग्रह एकनाथ शिंदे कधी टाळत नाहीत. असाच एक प्रसंग काल जळगाव विमानतळाबाहेर घडला. जळगाव विमानतळावर पिंक रिक्षा चालविणाऱ्या रंजना सपकाळे या लाडक्या बहिणीच्या आग्रहास्तव त्यांच्या रिक्षात बसून एकनाथ शिंदेंनी प्रवास केला. यावेळी रिक्षामध्ये मंत्री गुलाबराव पाटील तसेच मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा सोबत बसले. या प्रसंगाने रिक्षाचालक रंजना सपकाळे मात्र भारावून गेल्या. एकनाथ शिंदे साहेब माझ्या रिक्षात बसले, हे मला एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटत आहे, मी आज खूप आनंदी आहे, असे रंजना सपकाळे म्हणाल्या. मी त्यांना बिग ब्रदर म्हणते. त्यामुळे माझ्या रिक्षात मी त्यांचं बिग ब्रदर म्हणून पोस्टर लावणार आहे, असेही रंजना सपकाळे यांनी आवर्जून सांगितले.

हेही वाचा

गाईला वाचवताना कचकाटून ब्रेक दाबला; ST बस अन् एर्टिगा कारचा भीषण अपघात, 4 जखमी