Eknath Khadse On Pune Rave Party Pranjal Khewalkar: प्रांजल खेवलकरांनी सासऱ्यांना सगळं सांगितलं; नेमकं काय घडलेलं?, एकनाथ खडसे म्हणाले...
Eknath Khadse On Pune Rave Party Pranjal Khewalkar: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं.

Eknath Khadse On Pune Rave Party Pranjal Khewalkar: पुण्यातील रेव्ह एका पार्टीवर (Pune Rave Party) 27 जुलै रोजी पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक करण्यात आली. सदर प्रकरणी सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याचदरम्यान आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद सदर प्रकरणावर विविध मुद्यांवर भाष्य केलं. मी आयुष्यात कधीच ड्रग्स घेतलं नाहीय, असं मला माझ्या जावयाने सांगितल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. पोलीस आधीपासुन प्रांजल खेवलकरांवर पाळत ठेऊन होते, अशी आरोपही एकनाथ खडसेंनी केला.
27 जुलै रोजी सकाळी पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकला आणि एकनाथ खडसेंचे जावयांना अटक केल्याची बातमी तुम्हाला सर्वांना माहिती असेल. माझ्या मनात पुणे पोलिसांच्या कारवाईविषयी प्रश्न आहेत. सात जणांची पार्टी सुरु होती, तिथे संगीत नाही, डान्स नाही, फक्त सात जण एका घरात बसले आहेत. त्याला रेव्ह पार्टी म्हणता येईल का? याला जर रेव्ह पार्टी म्हणायचे असेल तर राज्यात कुठेही कोणीही घरात पाच-सात जण पार्टीला बसले तर त्याला रेव्ह पार्टी म्हणावे लागेल. मला पोलिसांना रेव्ह पार्टीची व्याख्या विचारायची आहे. रेव्ह पार्टी सांगून पोलिसांनी बदनामी करण्याचे काय प्रयोजन होते, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.
पोलिसांनी केवळ बदनामी करण्यासाठी हे कृत्य केले-
याप्रकरणात पोलिसांनी जी कारवाई केली, त्यावेळी व्हिडीओ सर्वांना दाखवले. पोलिसांना एखाद्याच्या खासगी आयुष्यातील व्हिडीओ दाखवण्याचा कोणता अधिकार आहे. पोलिसांनी केवळ बदनामी करण्यासाठी हे कृत्य केले आहे. पोलिसांना अशाप्रकारे कोणाचेही चेहरे, विशेषत: महिलांचे चेहरे दाखवण्याचा अजिबात अधिकार नाही. मात्र, पोलिसांनी पुरुष आणि महिलांचे फोटो दाखवून त्यांची बदनामी केली. तसचे प्रांजल खेवलकर यांना एक नंबरचा आरोपी करण्याचे कारण काय, असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला. त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, असे पोलिसांनी सांगितले. प्रांजल खेवलकरांवर आयुष्यात एकही गुन्हा दाखल नाही. ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही. ते वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. ज्याठिकाणी पोलिसांनी अंमली साठा सापडला तो एका मुलीच्या पर्समध्ये सापडला, हे पोलिसांच्या व्हिडीओत दिसत आहे. त्या मुलीलाही हे माहिती नाही, असे ती म्हणत आहे. तिला पहिल्या क्रमांकाची आरोपी करायला पाहिजे होते. प्रांजल खेवलकर आणि इतरांनी कोणताही अंमली पदार्थ बाळगला नव्हता. मग तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करुन इतरांना साक्षीदार केले पाहिजे होते. मात्र, प्रांजल खेवलकरांना पहिल्या क्रमांकाचा आरोपी करुन एकनाथ खडसेंच्या कुटुंबाला बदनाम करण्याचे कृत्य पोलिसांनी केले.
अहवालात छेडछाड करण्याचा प्रयत्न करत नाहीत ना?
काल मला कळालं की, दोन जणांच्या रक्तात अल्कोहोल सापडलं. हा रिपोर्ट बाहेर कसा आला? डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल तर तो पोलिसांकडे येतो. तो मीडियाकडे कसा आला? मग अजून ड्रग्जचा रिपोर्ट का येत नाही? मला संशय घ्यायला जागा आहे की, ड्रग्ज रिपोर्टबाबत छेडछाड होण्याचा प्रयत्न असावा. कारण अशा प्रकारांमध्ये ससून रुग्णालयाचे नाव अग्रेसर आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलण्यात आले. दोन डॉक्टर जेलमध्ये आहेत. मग पुणे पोलीस याप्रकरणात ड्रग्जचा अहवालात छेडछाड करण्याचा प्रयत्न करत नाहीत ना? अल्कोहोल दोघांनी घेतल्याचं नावं येत, प्रांजल खेवलकरांचं नाव आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
प्रांजल खेवलकरांनी एकनाथ खडसेंना काय काय सांगितलं?
माझ्या जावयाने मला सांगितलं की, मी आयुष्यात कधीही ड्रग्ज घेतलेले नाही, आताही घेतलेले नाही. वैद्यकीय अहवालात या गोष्टी समजतील. पण तो रिपोर्ट अजून का येत नाही, यामध्ये संशय घ्यायला जागा आहे. माझ्या जावयाने सांगितलं की, माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. ते दोन-तीन ठिकाणी गेले तिथे त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. सिव्हिल ड्रेसमधील पोलीस त्यांच्यावर पाळत ठेऊन होते. त्याचे व्हिडीओ आहेत. पोलिसांना प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवण्याचे काय कारण आहे? ज्या हॉटेलमध्ये हे सगळे गेले होते, तिकडेही पोलीस रात्री 1 ते 2.30 च्या दरम्यान आले. या हॉटेलच्या पार्किंगमधील व्हिडिओ कॅमेऱ्यात सिव्हिल ड्रेसमधील पोलीस दिसत आहेत. त्याच पोलिसांनी छापा टाकला. हा प्रकार संशयास्पद आहे. पोलीस इतकी तत्परता दाखवतात की, लगेच पत्रकार परिषद आणि व्हिडीओ दाखवतात. एवढी तत्परता प्रफुल लोढा जो हनी ट्रॅपमध्ये अडकलेला आहे, बलात्कारात अडकलेला आहे, ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केले आहे, यासंदर्भात पोलीस यंत्रणा पुढाकार घेऊन जनतेला का माहिती देत नाही? नाशिकला जे काही सेक्स स्कँडल झालं,त्याचा गवगवा झाला. त्या महिलेने अनेक आरोप केले आणि मागे घेतले. त्यावर पोलीस आणि सरकारी यंत्रणा का बोलत नाही? पोलीस यंत्रणेने खडसेंना कशा रितीने बदनाम करायचे, हा प्लॅन आखलेला दिसत आहे. वारंवार खडसेंचे जावई, दाखवले जात आहे. सत्य असेल तर कारवाई करायला माझी हरकत नाही. पण प्लॅन करुन कोणी कारवाई करत असेल तर योग्य नाही. सरकारने याचे उत्तर दिले पाहिजे. पोलीस कारवाईतील फोटो आणि व्हिडीओ कसे बाहेर आले, असा सवाल खडसे यांनी विचारला.























