Eknath Khadse:जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) या दोन्ही पक्षांमध्ये घराणेशाहीचे अस्तित्व दिसून आले आहे. अनेक आमदार आणि नेत्यांनी पत्नीला किंवा आपल्या नातेवाईकांना नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरवले आहे. चाळीसगावमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण रिंगणात आहेत. पाचोरा मध्ये शिवसेना (शिंदे गट) आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांच्या पत्नी सुनीता पाटील उमेदवार आहेत. जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्ष म्हणून विरोध निवड झाली आहे. भुसावळमध्ये भाजप नेते संजय सावकारे (Sanjay Savkare) यांच्या पत्नी रंजना सावकारे मैदानात उतरल्या आहेत. मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची कन्या रंजना पाटील शिंदेसेनेकडून उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गिरीश महाजन यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. 

Eknath Khadse: माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद

महाविकास आघाडीच्या भुसावळ येथील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गायत्री भंगाळे यांच्या प्रचार सभेत एकनाथ खडसे म्हणाले की, आपल्यावर घराणे शाहीचा आरोप करणाऱ्यांची सध्या तोंड बंद झाली आहेत. कारण मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या बायकांना तिकीट देण्यात आल्यानं आता त्यांची बोलती बंद झाली. नेहमी नाथाभाऊ हे घराणेशाही राबवतात, असे माझ्यावर नेहमी आरोप होत आले.  जे नेहमी घराणेशाहीचे माझ्यावर आरोप करत होते, आता त्यांचे थोबाडे बंद झाले आहेत. सावकारे यांनी त्यांच्या पत्नीला तिकीट दिलं. मंत्र्याच्या बायकोला तिकीट देण्यात आलं. जामनेरमध्येही मंत्र्याच्या बायकोला तिकीट दिलं ,बिनविरोध निवडून आणले गेले, असे टीका त्यांनी केली आहे. 

Eknath Khadse: मग आता तुम्ही कोणती शाई लावली? 

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, गिरीश महाजन म्हणतात की, खडसे नेहमी घराणेशाही राबवतात. मग आता तुम्ही कोणती शाई लावली? महाजन साहेब आता तुम्हाला कोणती शाई लागेल, साधनाताईला तुम्ही बिनविरोध निवडून आणलं. मंगेश चव्हाण, किशोर आप्पा यांनी त्यांच्या बायकोला तिकीट दिलं. माझ्यावर टीका करणारे आता कुठे गेले? माझ्यावर घराणेशाहीचे आरोप करणारे कुठे गेले? असे म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. 

आणखी वाचा 

Rohit Pawar on Girish Mahajan: बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? गिरीश महाजनांसारख्या बेफाम मंत्र्यांचा फडणवीसांनी तत्काळ राजीनामा घ्यावा; जामनेर निवडणुकीवरून रोहित पवार संतापले