मुंबई: महापालिकेत सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडून नव्या 'इनोव्हा' गाड्यांच्या (Innova car) मागणीवरून सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी थेट खेळण्याच्या दुकानात जाऊन खेळण्यातील 'इनोव्हा' (Innova car) गाड्या खरेदी करत पदाधिकाऱ्यांची जोरदार खिल्ली उडवली आहे. तसेच, पक्षाच्या वतीने या गाड्या गिफ्ट पॅक करून संबंधितांना कुरिअरद्वारे पाठवण्यात येत आहेत.(Innova car)
Sandeep Deshpande: 'हट्ट करायचा नाही, रोज सभागृहात जायचं!'
काल समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) खेळण्यांच्या दुकानात जाऊन ६ खेळण्यातील इनोव्हा गाड्यांची मागणी करताना दिसले. दुकानदार कडे त्यावेळी ३ च गाड्या उपलब्ध असल्याने त्यांनी त्या खरेदी केल्या आणि उरलेल्या गाड्या शुक्रवारी पाठवण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपरोधिक टोला लगावत देशपांडे म्हणाले, "उपमहापौर, वैधानिक समित्यांचे अध्यक्ष सगळ्यांना इनोव्हा गाडी पाहिजे. हट्ट करू नका, लोकांचे पैसे वाया घालवू नका. तुमच्यासाठी मनसेतर्फे आम्ही इनोव्हा पाठवतोय. आता व्यवस्थित रोज सभागृहात जायचं, गाडी पाहिजे म्हणून हट्ट करायचा नाही."(Sandeep Deshpande)
Sandeep Deshpande: गिफ्ट पॅक करून महापालिकेला कुरिअर
महापालिकेत इनोव्हा गाड्यांच्या खरेदीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार गदारोळ झाला आहे. या उधळपट्टीला विरोध दर्शवण्यासाठी आज मनसेचे शाखाध्यक्ष संतोष साली यांच्या माध्यमातून या खेळण्यातील गाड्या आकर्षक गिफ्ट पॅक करून महापालिका प्रशासनाला आणि पदाधिकाऱ्यांना कुरिअरद्वारे पाठवण्यात येणार आहेत. मनसेच्या या अनोख्या आंदोलनाची आणि खोचक टीकेची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
Sandeep Deshpande: सगळ्यांना इनोव्हा गाडी पाहिजे, हट्ट करू नका, लोकांचे पैसे....
संदीप देशपांडे यांनी त्यांच्या एक्सवरती याबाबतचा एक व्हिडीओ काल शेअर केला होता. यामध्ये ते एका खेळण्याच्या दुकानात जातात आणि इनोव्हा कारची मागणी करतात, याचवेळी ते म्हणातात की, "नमस्कार! आपले उपमहापौर, सगळे वैधानिक समितीचे अध्यक्ष... सगळ्यांना इनोव्हा गाडी पाहिजे. हट्ट करू नका, लोकांचे पैसे वाया घालवू नका. तुमच्या सगळ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही इनोव्हा तुम्हाला पाठवतोय... आयुक्तांकडे पाठवतोय. प्रत्येकाने आपापली इनोव्हा न विचारता घ्या, ओके?"
तर खेळण्यांच्या दुकानातील खरेदी (दुकानात जाऊन) ते दुकानदाराला म्हणातात, "इनोव्हा आहे का इनोव्हा?" (गाडी हातात घेऊन)"ही बघा... इनोव्हा गाडी तुमच्यासाठी घेतोय. ६ इनोव्हा पाहिजेत, कुठले कुठले कलर आहेत?" "६ इनोव्हा द्या." खेळण्यातील कार ते दुकानदार पॅक करताना संदीप देशपांडे म्हणतात की, "काकांकडे ३ च इनोव्हा आहेत. शुक्रवारी अजून ३ इनोव्हा आणून देणार आहेत, तेव्हा पाठवून देईन. आता व्यवस्थित रोज सभागृहात जायचं, हट्ट करायचा नाही... गाडी पाहिजे, गाडी पाहिजे! सगळ्यांना गाडी मिळणार आहे, ओके? चला, शुभेच्छा!"
BMC Mumbai: इनोव्हा कार प्रकरण नेमकं काय?
मुंबई महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या सेवेसाठी अवघ्या सहा महिन्यांतच पुन्हा एकदा महागड्या नवीन गाड्या खरेदी करण्याचा घाट घातला जात आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात खरेदी करण्यात आलेल्या 'स्कॉर्पिओ एन' गाड्या प्रवासासाठी सोयीच्या नसल्याची तक्रार करत, आता त्यांच्या जागी महागड्या 'इनोव्हा क्रिस्टा' गाड्या देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला जात आहे. हा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
BMC Mumbai: 'स्कॉर्पिओ सोयीची नाही'; सभागृह नेत्यांची तक्रार
महापालिकेत नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना प्रशासनाकडून वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये महापौर रितू तावडे यांच्या सेवेसाठी सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांची 'इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड' गाडी देण्यात आली आहे. तर उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि विविध वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी 'स्कॉर्पिओ एन' वाहने देण्यात आली आहेत. मात्र, देण्यात आलेली 'स्कॉर्पिओ एन' ही गाडी प्रवासासाठी सोयीची वाटत नसल्याची थेट तक्रार सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली आहे. त्यामुळे आता सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि तीन वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी पुन्हा नव्या 'इनोव्हा क्रिस्टा' गाड्या खरेदी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
BMC Mumbai: नेमक्या या गाड्या केव्हा खरेदी केल्या कोणासाठी आणि किती खरेदी केल्या?
मुंबई महापालिकेने महापौर उपमहापौर त्यासोबतच विरोधी पक्षनेत्या सभागृहनेते त्यासोबत विविध समित्यांचे अध्यक्ष यांच्यासाठी महापालिका महापौर निवडणूक होण्याआधी फेब्रुवारी महिन्यात तेरा गाड्यांची खरेदी केली होती... ही प्रक्रिया प्रशासकीय राजवट असताना पार पडली. ज्यामध्ये महापौरांसाठी एक इनोवा हाय क्रॉस हायब्रीड गाडी व इतर उपमहापौर सभागृह नेते विरोधी पक्षनेते आणि विविध समित्यांचे अध्यक्ष यांच्यासाठी १२ स्कॉर्पिओ एन गाड्यांची खरेदी करण्यात आली. इनोव्हा'ची किंमत ३० लाख रुपये, तर एका स्कॉर्पिओची किंमत १८ लाख रुपये आहे, असा एकूण दोन कोटी १६ लाख रुपये खर्च या वाहनांवर करण्यात आला. महापालिका निवडणूक होण्याआधी मागील पावणे चार वर्षांमध्ये नगरसेवक आणि महापौर व विविध समित्यांचे अध्यक्ष नसल्याने त्यांच्या वाहनांचा वापर अधिकारी वर्गाने केला होता.. त्यामुळे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौरांसह विविध वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी वाहने खरेदीची प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापन विभागाने पार पाडली होती.
