सातारा : राज्यात सध्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. एकीकडे विधानपरिषद ( Vidhanparishad) निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे, उमेदवारांनी मोठ्या संख्येने आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे जिल्हा बँकांच्या निवडणुका सुरू आहेत, त्यात सातारा जिल्ह्यातून पहिला गुलाल उधळण्यात आला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Bank) निवडणुकीत आज एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. खा. उदयनराजे भोसले यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे, सर्वच स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे.
गृहनिर्माण आणि दूध संस्थांमधून उदयनराजेंनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या विरोधात संचालकपदासाठी अर्ज दाखल केलेले ज्ञानेश्वर पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. छत्रपतींच्या गादीचा सन्मान आणि आदर म्हणून आपण उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले. या बिनविरोध निवडीनंतर उदयनराजे समर्थकांनी जलमंदिर पॅलेस येथे जाऊन उदयनराजे यांचे बुके देऊन स्वागत केले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 जागांसाठी 236 पैकी 224 अर्ज शिल्लक वैद्य राहिले आहेत. मात्र, उदयनराजेंच्या बिनविरोध निवडीमुळे राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे.
पदाची अपेक्षा नाही, सर्वसामान्यांचा उत्कर्ष हीच भूमिका
या बिनविरोध निवडीनंतर उदयनराजेंनी आपली प्रतिक्रिया दिली असून सर्वसामान्यांची प्रगती आणि उत्कर्ष यासाठीच आपण ह्या निवडणुकीत अर्ज भरल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत आणि तालुक्यांत अनेक सहकारी संस्था लिक्विडेशनमध्ये निघाल्या आहेत आणि यामागील मूळ कारण राजकारण आहे. सरकारी चळवळ "लोकांनी, लोकांसाठी" या तत्त्वावर सुरू झाली होती, पण त्याचा विसर पडत चालला आहे. आपली जिल्हा बँक नावारूपाला आली असून तिला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. इतर बँकांसारखी तिची अवस्था होऊ नये आणि या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी व उपेक्षित घटकांची जास्तीत जास्त सेवा व्हावी, हाच आपला उद्देश आहे. या बँकेत आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा किंवा वैयक्तिक स्वार्थ नसून केवळ सर्वसामान्य माणसांची प्रगती आणि उत्कर्ष व्हावा, हीच आपली भूमिका आहे.
दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, तो वेगळा भाग असून निवडणुका पुढे ढकलायच्या की नाही, याचा निर्णय शासन पातळीवर घेतला जाईल.
हेही वाचा
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
