सातारा: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती दुर्दैवी निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत, या निर्णयाबाबत शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांना काहीही कल्पना नसल्याचं शरद पवार यांनी सकाळी माध्यमांशी सांगितले, याबाबत आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी सविस्तरपणे भाष्य केलं आहे. त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा होती, बैठका झाल्या होत्या, आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर, नेतृत्व कोण करणार याबाबतच्या प्रश्नावरती बोलताना शिंदे म्हणाले, जर तरच्या गोष्टींवर बोलण्यापेक्षा दोन्ही पक्षात अजितदादा नाहीयेत. काही भूमिका ठरल्या होत्या. दादा नसल्यानंतर काय करायचं, चर्चा करू मग निर्णय घेऊ. त्यांनी काय करायचं त्यांनी कसा रिस्पॉन्स द्यायचा हा त्यांचा निर्णय आहे, असंही पुढे शशिकांत शिंदे म्हणालेत.(Shashikant Shinde)
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची घाई गडबड का केली जात आहे. याचे उत्तर सुनेत्रा वहिनी आणि त्यांचे कुटुंबीय आणि त्याचबरोबर पक्षाचे ज्येष्ठ नेते किंवा मुख्यमंत्री आणि त्यांची सहकारी देतील. दादांचं जाणं हे महाराष्ट्रासाठी दुःखदायक आहे. महाराष्ट्र दादांच्या जाण्याने दुःखात असताना हा निर्णय का घेतला कशासाठी घेतला ते आम्हाला माहिती नाही यावर तेच बोलतील असंही शिंदे म्हणालेत. तर शरद पवार साहेबांसोबत जेव्हा मी गेलो त्याच्या आधी गेल्या तीन महिन्यांमध्ये 8, 10 बैठका झाल्या होत्या. निवडणुका झाल्यानंतर दोन्ही पक्षाचे एकत्रिकरण करण्याचा निर्णय झाला होता. याची भूमिका शरद पवारांच्या समोर देखील मांडण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली आहे.(Shashikant Shinde)
बैठकीत नेमकी चर्चा काय झाली होती
17 जानेवारीच्या बैठकीचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्याची बैठक जयंत पाटलांच्या घरी न होता शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. सर्वजण बसलो होतो. बाकीचे नेते का नव्हते यावर अजितदादांना विचारवं असता त्यांनी सांगितलं होतं, प्रांताध्यक्ष आणि बाकीचे लोकांशी चर्चा मी केलेली आहे मी करतोय, तुम्ही त्याची काळजी करू नका निर्णय मी घेतला आहे. अजित दादांनी सांगितलं होतं. त्यामुळे बहुतेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घड्याळावर उमेदवार उभे केले. 7 तारखेला निकाल लागल्यानंतर पक्ष एकत्र करण्याचा निर्णय घ्यायचा अशी चर्चा त्यावेळी झाली होती, असंही शशिकांत शिंदेंनी सांगितलं आहे.
अजितदादांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणायची होती मात्र दादांच्या पक्षातील बड्या नेत्यांना हे मान्य नव्हतं का? या प्रश्नावर उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं यासंदर्भात मला कल्पना नाही. सर्व प्रक्रिया झाल्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांची चर्चा करून एकत्र बसण्याचा प्रयत्न करू, त्यांनी तो निर्णय घ्यायचा ते निर्णय काय घेणार त्यावर पुढची भूमिका ठरवू असंही पुढे शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
