Dharashiv ZP: धाराशिव जिल्हा परिषदेत (Dharashiv Zilla Parishad) शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चांना शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी ठाम शब्दांत फेटाळून लावले आहे. “आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो असून, जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष होणार” असे स्पष्ट करत त्यांनी सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिलाय.
रवींद्र गायकवाड यांनी सांगितले की, महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो, महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. अध्यक्ष भाजपचा होणार की शिवसेनेचा होणार हे ठरलं नाही. त्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
Dharashiv ZP: अध्यक्षपदासाठी दोन नावे चर्चेत
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून अर्चना पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्या भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. तर शिवसेनेकडून माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.
Dharashiv ZP: निकालानंतर मुंबईत हालचाली वाढल्या
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होताच सर्व प्रमुख नेत्यांनी मुंबईत तळ ठोकल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेच्या रणनीतीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नीच्या अध्यक्षपदाला विरोध आहे. आमदार तानाजी सावंत निवडणुकीपूर्वी महायुतीत नव्हते, त्यामुळे सावंतांना वगळून सत्ता स्थापन करण्याची भाजपची रणनीती असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेत नेमकी कोण सत्ता स्थापन करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Dharashiv ZP: निकालाचा थोडक्यात आढावा
धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजप 19 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला 15 जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागांवर यश मिळाले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले असून काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र एकही जागा जिंकता आलेली नाही.
धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल- (Dharashiv ZP Election 2026)
एकूण जागा- 55भाजप - 19शिवसेना (शिंदे गट) - 15ठाकरे गट (शिवसेना उ.बा.ठा.) - 7राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) -6काँग्रेस- 3अपक्ष - 3अपक्ष (भाजप पुरस्कृत) - 1समाजवादी पक्ष - 1
आणखी वाचा
