धाराशिव : राज्यात तीन पक्षांच्या महायुतीचं सरकार असले तरी स्थानिक स्तरावर काही नेत्यांमध्ये वाद असल्याचं सातत्याने पाहायला मिळत आहे. त्यातच, धाराशिव जिल्ह्यात माजी मंत्री तथा शिवसेना नेते तानाजी सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते राहुल मोटे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. राहुल मोटे यांचा पराभव करुनच तानाजी सावंत आमदार बनले आहेत. त्यामुळे, महायुती म्हणून एकत्र असले तरी दोन्ही नेते आणि कार्यकर्त्यांमधील वादाचे पडसाद अनेकदा पाहायला मिळतात. सोमवारी मध्यरात्री देखील दोन्ही पक्षाच्या आणि नेत्यांचे समर्थक आपापसात भिडल्याचं दिसून आलं
धाराशिव जिल्ह्याच्या तेरखेडा येथे सत्ताधारी महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. त्यामध्ये इनोव्हा, फॉर्च्यूनर आणि थार यांसारख्या दहा ते बारा गाड्या फोडण्यात आल्या आहेत. आमदार तानाजी सावंत गटाच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर उन्माद सुरू असून त्यातूनच हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. तर विधानसभा आणि जिल्हा परिषदेतील पराभव प्रस्थापितांना पचवता येत नाही. त्यामुळे आमच्यावर आरोप केले जात असून कायम वाद उकरून काढला जात असल्याचं मत सावंत गटाने व्यक्त केलंय. राहुल मोटे यांच्या सांगण्यावरूनच हे सार होत असल्याचा आरोप देखील शिवसेना कार्यकर्त्यांनी केला. तर राष्ट्रवादीने स्वतःच्या गाड्या फोडून आमच्यावर आरोप केल्याचा दावा सावंत गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या नसल्याने पोलिसांनी या प्रकरणात स्वतःहून तक्रार दाखल करत 45 जणांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींची शोध मोहीम सुरू केली आहे.
