Beed News: राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीतील सध्याचा काळ हा अवघड आणि आव्हानात्मक मानला जात आहे. मस्साजोग गावच सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder case) यांच्या निर्घृण हत्याप्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) 'राईट हँड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी हा आजार जडला होता. त्यामुळे धनंजय मुंडे हे जवळपास अज्ञातवासात गेले होते. काही दिवसांपूर्वीच ते इगतपुरी येथे विपश्यनेसाठी (Vipassana) गेले होते. याचदरम्यान त्यांच्या डोळ्यांचंही ऑपरेशन पार पडले होते. विपश्यना पूर्ण झाल्यानंतर धनंजय मुंडे हे सोमवारी बीडमध्ये (Beed News) परतले. बीडमध्ये परतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सर्वप्रथम माजलगावचे दिवंगत माजी आमदार आर.टी. देशमुख (R T Deshmukh Death) यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी लातूर येथील अपघातात आर.टी. देशमुख यांचा मृत्यू झाला होता. 

धनंजय मुंडे यांनी आर.टी. देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला वंदन केले. यानंतर आर.टी. देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांची विचारपूस आणि सांत्वन केले. धनंजय मुंडे यांनी आर.टी. देशमुख यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना आलिंगन देऊन त्यांचे सांत्वन केले. 

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणाची महत्त्वाची सुनावणी, उज्ज्वल निकम कोर्टात येणार

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे आजच्या सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित असतील. गेल्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांकडून डिजिटल पुराव्यांची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप या प्रकरणातील डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता. त्यामुळे आजच्या सुनावणीत पुन्हा याची मागणी केली जाऊ शकते. तसेच वाल्मीक कराडच्या डिस्चार्ज एप्लीकेशनवर त्याच्या वकिलांकडून म्हणणे मांडले जाईल. याबरोबरच विष्णू चाटेला लातूरहून बीडच्या जिल्हा कारागृहात आणण्याची मागणी वकिलांकडून करण्यात आली. या संपूर्ण महत्त्वाच्या बाबींवर आज सरकारी पक्ष आणि आरोपीच्या वकीलांकडून युक्तिवाद होईल. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

धनंजय मुंडे मन:शांतीसाठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात; पंकजा मुंडे म्हणाल्या, योग्य पर्याय निवडला!