बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही
Suresh Dhas: बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आज नारळी सप्ताहनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली होती.

बीड : जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आमदार सुरेश धस (Suresh dhas) आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर शेजारी शेजारी बसल्याचं दिसून आलं. दोघांचा एकमेकांशी मनमोकळा संवाद साधतानाचा व्हिडिओ देखील समोर आला. आता, याप्रकरणी सुरेश धसांनी भाष्य केलंय. धस-मुंडे संघर्ष अजून संपलेला नाही. संघर्ष सुरू राहील पण बाकीच्या ठिकाणी, हे अध्यात्माचे स्टेज आहे, इथे नो राजकारण, इथून रोडवर गेल्यावर राजकारण सुरू होईल अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताह निमित्त आमदार धनंजय मुंडे (Dhananjay munde) आणि सुरेश धस यांच्यात जवळीकता पाहायला मिळाली. मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या भाषणात सुरेश धस यांचा उल्लेख केला. त्यामुळे, बीड (Beed) जिल्ह्यात मुंडे-धस यांच्यातला हा सुप्त संघर्ष मिटला का? असा प्रश्न प्रत्येकाला पडावा असेच चित्र आज पाहायला मिळालं. परंतु मुंडे- धस हा संघर्ष संपला नसल्याचं सुरेश धस यांनी ठामपणे सांगितलं.
बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आज नारळी सप्ताहनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली होती. त्यामुळे, जिल्ह्यातील भाजप आणि महायुतीचे नेते देखील कार्यक्रमस्थळी होते. याच कार्यक्रमात आमदार सुरेश धस आणि आमदार धनंजय मुंडे शेजारी शेजारी बसल्याचं दिसून आलं, दोघांमध्ये गप्पाही रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, गेल्या काही महिन्यांपासून धस आणि मुंडे यांच्यातील संघर्ष संपल्याच भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली. कारण, बीडमधील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले होते. त्यामध्ये, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी सातत्याने केली होती. त्यामुळे, धस आणि मुंडे यांच्यात राजकीय तणाव आणि संघर्ष वाढल्याचं दिसून आलं. मात्र, नारळी सप्ताहाच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र आले होते. यासंदर्भात सुरेश धस यांनी माहिती दिली.
येथील व्यासपीठावर धनंजय मुंडे यांच्यासोबत माझी चर्चा झाली नाही. ते पाहुणे म्हणून आल्यानंतर बोलणं काम होतं. स्टेजवर लगेच भांडण करायचं का? असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला. तर, मस्साजोग येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होईल असं सुरेश धस यांनी सांगितले. धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी विनंती केली. लोकशाहीत एखाद्याला निवडणूक लढवावी वाटते, आणखी माघार घ्यायची वेळ गेलेली नाही. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत, असेही धस यांनी सांगितले.
हेही वाचा
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं






















