Dhananjay Munde & Ratnakar Gutte: धनभाऊ तुमची लायकी आहे का? तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता पण भय्यू महाराजांनी तुम्हाला वाचवले होते. तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हेदेखील मला माहिती आहे, पण मी सगळेच आता काढणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांनी केला. रत्नाकर गुट्टे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या पूर्वसंध्येला गंगाखेड येथे आयोजित जाहीर सभेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोपही केले. (Parbhani news)
तुम्हाला ज्यांनी सर्व पदं दिली त्यांनाही तुम्ही सोडले नाही. या सगळ्याची सुरुवात तुम्ही केली, आता याचा शेवट मी करणार. गंगाखेड नगर परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांच्या मोठ्या भगिनी उर्मिला मधुसूदन केंद्रे या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरल्या आहेत. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे हे गंगाखेडमध्ये त्यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेमध्ये रासाप आमदार रत्नाकर गुट्टेंवर यांच्यावर शेतकऱ्यांचे पैसे खाल्ल्याचा आरोप केला होता. यानंतर रत्नाकर गुट्टे यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार केला. त्यांनी म्हटले की, "भय्यू महाराज आता हयात नाहीत. मात्र, तुमचा इंदौरमध्येच मर्डर झाला असता भय्यू महाराजांनी तुम्हाला वाचवले. तुमची लायकी आहे का? तरीही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी तुम्हाला सर्व पदं दिली. तुम्हाला तिथेही पंकजा ताई यांच्याविरोधात निवडणूक लढायची होती. तुम्ही सुरुवात केलीय मी याचा शेवट करणार.तुम्ही मला नीरव मोदी म्हणालात, पण तुम्ही तर विजय मल्ल्या आहात, कारण विजय मल्ल्याच्या आवडी आणि तुमच्या आवडीनिवडी एकच आहेत. तुम्ही गंगाखेडला आलात, मला तर परळीला यायला फक्त पंधरा मिनिटं लागतात, मी राजा आहे, मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो, मी त्या पक्षांच्या स्टेजवर जाईन पण धनुभाऊ तुमचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही,", असा इशारा रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांना दिला.
तुम्ही मला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली, त्यांच्यासाठी किती ताकद लावली, हे देखील मला माहित आहे. पण माझी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनता हीच माझं बुलेटप्रूफ जॅकेट आहे, त्यामुळे माझा पराभव होऊ शकला नाही, मी प्रचंड मताधिक्याने विजयी झालो, असेही रत्नाकर गुट्टे यांनी म्हटले.
आणखी वाचा
