Dhananjay Mahadik on Satej Patil :  यंदा गोकुळ दूध संघाची (Gokul Milk Union) दहीहंडी महायुतीच फोडणार असल्याचा विश्वास भाजपचे खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांनी व्यक्त केला. 25 विरुद्ध शून्य अशा मतांनी गोकुळवर महायुतीची पुन्हा सत्ता येणार असल्याचा दावा महाडिकांनी केलाय. त्याचबरोबर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटलांवर (Satej Patil) देखील त्यांनी टीका केलीय. त्यांच्या समविचारी आघाडीकडं उमेदवार नसल्याने ते सध्या सर्वांच्याच भेटीगाठी घेत असल्याचा टोला महाडिकांनी लगावला.  

Continues below advertisement

विधान सभेप्रमाणे यंदा गोकुळ वर सुद्धा महायुतीचीच सत्ता राहणार

आता सतेज पाटील समविचारी पक्ष म्हणून गोकुळच्या राजकारणात फिरत आहेत, तर यापूर्वी त्यांची समविचारी आघाडी कुठे गेली होती? असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी केला.  आमचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, आमदार आणि संचालकाची त्यांनी भेट जरी घेतली तरी दोन्ही बाजूंनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी सुरुच राहणार असल्याचे महाडिक म्हणाले. विधान सभेप्रमाणे यंदा गोकुळ वर सुद्धा महायुतीचीच सत्ता राहणार असल्याचे महाडिक म्हणाले. 

सतेज पाटील आणि आम्ही एकत्र येण्याची कोणतीही चिन्ह नाहीत

मी यापूर्वी देखील सांगितलं होतं आत्ता सुद्धा सांगतो राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो असे धनंजय महाडिक म्हणाले. गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने सतेज पाटील आणि आम्ही एकत्र येण्याची कोणतीही चिन्ह नाहीत, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.  

Continues below advertisement

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांचा गट, शिवसेना, जनसुराज्य विरुद्ध महाडिक गट असा सुप्त संघर्ष गोकुळ निवडणूक प्रक्रियेच्या दरम्रयान होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाविकास आघाडीकडून एकटे काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे निवडणुकीच्या प्रचारानिमित्त रान उठवत आहेत. महायुतीमध्ये एकटे पडलेल्या भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका आमदार सतेज पाटील यांनी लावला आहे. त्यामुळे गोकुळच्या राजकारणात नवी समीकरणे उदयाला येणार की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसापासून सतेज पाटील हे गोकुळच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागले आहेत. समविचारी लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळं आता गोकुळच्या निवडणुकीत नेमकं काय होणार हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे.