मुंबई : राज्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या असल्या तरी त्यांना जात प्रमाणपत्र दिली जात नाहीत, त्यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं जाईल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी ज्यांनी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना ते देण्यात आलं आहे, या बाबतीत प्रलंबित प्रकरणं कमी आहेत, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. यातूनही जर काही राहिलं आहे असं कुणाला वाटत असेल तर त्यांच्याशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले.
महायुतीच्या सरकारने मराठा समाजासाठी जेवढे निर्णय घेतले आहेत ते या आधीच्या कोणत्याही सरकारने घेतले नाहीत. यातूनही जर काही राहिलं आहे असं कुणाला वाटत असेल तर त्यावर चर्चा करून मार्ग काढला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
नागपूरच्या पावसासंबंधी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नागपुरात पाच वाजेनंतर मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपुरात काही ठिकाणी कामं सुरू आहेत, ती अर्धवट आहेत, त्यामुळे पाणी साचलं. पण एका तासात जर जास्त पाऊस पडला तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा नाही."
पीक विमा योजनेतून बऱ्याच शेतकऱ्यांची नावे कमी झाल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "आपण एका रुपयात पीक विमा देतो. त्यामुळे सर्वांनीच तो पीक विमा काढला. पण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बोगसगीरी झाल्याचं समोर आलं. त्यावर आपण कारवाई केली. त्यामुळेच आता त्याच्या लाभाची संख्या कमी आली आहे."
Devendra Fadnavis On Rahul Gandhi : राहुल गांधींवर टीका
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, "कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याने चुकीचं काही घडलं असेल तर आरोप नक्की करावेत. पण राहुल गांधी यांनी युवकांसंबंधी असा कोणता मुद्दा उचलला आहे की ज्यामुळे त्यांचं भलं झालं आहे. मोदींनी युवकांसाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. हे परीक्षा फुटी विरोधातील बिल पास झालं तर नक्कीच युवकांचं कल्याण होईल."
दरम्यान, नीट पेपरफुटीसंबंधी मुंबईत झालेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रामध्ये पोलिसांनी अत्यंत संयमाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भरपूर काही गुन्हे दाखल झालेले नाहीत. जे काही गुन्हे दाखल झाले आहेत ते जमावबंदीचे गुन्हे आहेत, ते मागे घेतले जातील, असं ते म्हणाले.
गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या नावे काही ठिकाणी बॅनर झळकल्याचं दिसून आलं. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नक्षलवाद्यांच्या नावे पत्रक लावले आहेत. त्यातून त्यांना काही स्वार्थ साधायचा असेल. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे."
ही बातमी वाचा:
