Devendra Fadnavis on Nashik Potholes: नाशिक (Nashik) शहरातील खड्ड्यांच्या (Potholes) गंभीर प्रश्नाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली. नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) महासिंहस्थ कुंभ (Kumbh Mela) जवळ आला असून, या पार्श्वभूमीवर विकासकामे सुरु आहेत. मात्र, यामुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक अपघातही घडले आहेत. वाढत्या अपघातांमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
Devendra Fadnavis on Nashik Potholes: नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खड्डे बुजवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी त्यांच्यावर दंड लावा, त्यांचे पुढचे काम थांबवा. लोकांना कारणे सांगू नका, त्यांना समाधान काढून द्या. असे रिलॅक्स राहून चालणार नाही. सर्व विभागांनी आपली जबाबदारी ओळखा. अधिकाऱ्यांनी सुद्धा चेंबरमध्ये बसून न राहता अधिक संवाद साधावा. महाकुंभ तोंडावर आहे, अधिक गांभीर्याने काम करा. इतका खर्च करून मोठी कामे होत असताना रोष येणार असेल तर कुठे चुकतो आहोत, याचे आत्मपरीक्षण करा. पुढच्या 1 महिन्यात पुन्हा बैठक घेईन तेव्हा गुणात्मक सुधारणा मला दिसली पाहिजे," असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देत खड्ड्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच, नागरिकांना केवळ कारणे न सांगता प्रत्यक्ष कामातून समाधान मिळाले पाहिजे, यावरही त्यांनी भर दिला. महासिंहस्थ कुंभासाठी देश-विदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने रस्त्यांची स्थिती सुधारण्यास प्राधान्य देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. पुढील एका महिन्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेऊन कामांची प्रगती तपासली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
Girish Mahajan: गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
दरम्यान, गिरीश महाजन म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी नाशिक महाकुंभाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नसून, सुरू असलेल्या कामांना अधिक गती देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. महाकुंभासाठी सुमारे 40 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याने प्रत्येक काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आऊटर रिंगरोड हा महत्त्वाचा प्रकल्प असून, कंत्राटदारांच्या अडचणी दूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सर्व अधिकाऱ्यांना कामाच्या गतीबरोबरच गुणवत्तेबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
यंदाच्या महाकुंभासाठी 10 ते 12 कोटी भाविक येण्याची शक्यता असल्याने त्यांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच शहरात अधिक हरित क्षेत्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. सध्या रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरिकांना काही प्रमाणात त्रास होत असल्याची वस्तुस्थिती मान्य करत त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त करण्यात आली. मात्र, सर्व रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते व्यवस्थित करण्याच्या कडक सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
