MNS Morcha Mira Bhayander: मोठी बातमी : मोर्चाला परवानगी नाकारुन सरकारच्या बदनामीचा हेतू आहे का? मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना विचारला जाब!
Devendra Fadnavis On MNS Morcha Mira Bhayander: अमराठी व्यापारांचा मोर्चा निघू शकतो, मग मराठी लोकांचा मोर्चा कशाला रोखताय, मराठी लोकांना ताब्यात का घेण्यात येतंय, असा सवाल उपस्थित केला.

Devendra Fadnavis On MNS Morcha Mira Bhayander: मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची हाक दिली होती. आज (8 जुलै) सकाळी बालाजी हॉटेल ते मीरारोड स्टेशनपर्यंत मोर्चा निघणार होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाआधी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा जारी केल्या आहेत. आज पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना ताब्यात घेतलं. तर वसई विरारमधीलही अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. सध्या मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. याचदरम्यान, अमराठी व्यापारांचा मोर्चा निघू शकतो, मग मराठी लोकांचा मोर्चा कशाला रोखताय, मराठी लोकांना ताब्यात का घेण्यात येतंय, असा सवाल उपस्थित केला जातोय. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
मीरा भाईंदर येथील मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली?, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्याकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तसेच मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का?, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देवेंद्र फडणवीसांना दिले आहेत. दरम्यान, मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती.
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मिरा भाईंदरमध्ये मनसेकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मनसे आणि पोलिसांची कालपर्यंत मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार त्या रुटबाबत चर्चा सुरु होती. मनसेचे नेते जाणीवपूर्वक संघर्ष होईल, असा रुट मागत होते. पण पोलीस त्यांना नेहमीचा रुट घ्या, असे सांगत होते. मात्र, मनसेने त्याला नकार देत आम्ही आमच्याच मार्गाने जाणार अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये- मंत्री प्रताप सरनाईक
पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे. मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे, असंही प्रताप सरनाईक म्हणाले. गृहखात्याचे आदेश नव्हते, तरी देखील पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून धरपकड केली, याची माहिती घेत आहोत, असंही प्रताप सरनाईकांनी सांगितले. पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आहे. व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला परवानगी देता मग मराठी एकीकरण समिती मोर्चा काढत होती. तर तुम्हाला काय अडचण होती? त्यांना मोर्चा का काढू दिला नाही. यामुळे महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत, असंही प्रताप सरनाईक म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे आहे. मीरा रोडमध्ये जे सुरुय ते अत्यंत चुकीचं आहे, असं थेट प्रताप सरनाईकांनी सांगितले.
























