Devendra Fadnavis on Ritu Tawde: मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावण्यात आलेल्या लाल-निळ्या फ्लॅश दिव्यांमुळे विरोधकांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातली होती. व्हीआयपी संस्कृती कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयानंतर बहुतांश सरकारी वाहनांवरील लाल दिवे हटवण्यात आले होते. मात्र, महापौरांच्या नव्या वाहनावर पुन्हा लाल-निळे फ्लॅश दिवे दिसल्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तसेच मुंबई महापालिकेत भाजप सत्तेत आल्यानंतर व्हीआयपी संस्कृतीने पुन्हा डोके वर काढल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. “मुंबईच्या महापौर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का?” असा सवाल करत मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडे यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, रितू तावडे यांच्या गाडीवरील लाल दिव्यांवरून वाद निर्माण झाला असतानाच या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Continues below advertisement

Devendra Fadnavis on Ritu Tawde: नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी याबाबत माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर नव्हता पण बोनेटच्या ठिकाणी लाल दिवा होता. त्यात महापौरांचा काहीही दोष नाही. राज्यात कोणीही लाल दिवा वापरू नये, हा आपला जुनाच निर्णय आहे. त्याची कल्पना महापौरांना देखील आहे. विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारे टार्गेट करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

Ritu Tawde: महापौरांच्या गाडीवरील लाल-निळे दिवे हटवले; पालिका प्रशासनाची माहिती

दरम्यान, या निर्माण झालेल्या वादानंतर महापौरांच्या अधिकृत गाडीवरील लाल-निळे फ्लॅश दिवे दोन दिवसांपूर्वीच काढून टाकण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. नियमांचे पालन करत हे दिवे हटवण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्या महापौरांच्या वाहनावर कोणतेही विशेष दिवे नसल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, महापालिकेतील इतर काही महत्त्वाच्या पदांवरील नेत्यांच्या वाहनांवरही अशाच प्रकारचे दिवे बसवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच सर्व संबंधित वाहनांवरील हे दिवे काढून टाकण्यात आल्याचेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

Continues below advertisement

आणखी वाचा 

Kishori Pednekar on Ritu Tawde: मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? रितू तावडेंच्या गाडीवरील लाल-निळे दिवे चर्चेत येताच किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल