Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एक अनप्रेडिक्टेबल व्यक्ती आहे. त्यांचा ईगो प्रॉब्लम आहे. आपल्या ईगोसाठी ते आपल्या घरालाही आग लावून मज्जा करू शकतात, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं. आमची वैचारिकदृष्ट्या विचार आणि भूमिका वेगळी आहे. पण एकमेकांचे शत्रू नाही. त्यामुळे 16 जानेवारीनंतर आम्ही चहा पिताना दिसू, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
माझे सर्वात जवळचे मित्र एकनाथ शिंदे आहे. त्यांच्या खालोखाल अजित पवार आहेत. तर राजकारणापलीकडे राज ठाकरे आणि दुरावलेले मित्र उद्धव ठाकरे असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच अजित पवारांचा स्ट्राईक रेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त राहील. ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरे यांना काहीच फायदा होणार नाही. उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फायदा होणार नाही. त्यांचा स्ट्राईक रेट सर्वात कमी राहील, असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी कॉफी विथ कौशिकमध्ये केला. (BMC Election 2026)
माझे पैजेचे 1 लाख रूपये घेऊन या- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray)
मी मुंबई सोडून सर्वत्र विकासावरच बोलतोय, त्यामुळे माझे पैजेचे 1 लाख रूपये घेऊन या, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. कॉफी विथ कौशिक या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला मारला. उद्धव ठाकरेंचं विकासावरचं भाषण दाखवा आणि सात हजार रूपये घेऊन जा, असं आव्हान आपण दिलं होतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मुंबईतल्या भाषणात आपण केवळ ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
