मुंबई: राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आज (मंगळवारी, ता १७) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार असून, या दौऱ्यात जागावाटप आणि मित्रपक्षांमधील समन्वयावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.(DCM Eknath Shinde)
शिवसेना खासदार आणि वकिलांसोबत महत्त्वाची बैठक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्लीत केंद्रीय अधिवेशनात सहभागी होणाऱ्या शिवसेना खासदारांची तातडीची बैठक घेतली. संसदेत पक्षाची भूमिका नेमकी काय असावी, याबाबत त्यांनी खासदारांना मार्गदर्शन केले. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईचा आढावा घेण्यासाठी ते वकिलांची भेट घेणार असल्याचेही कळते.
अधिवेशन सोडून दिल्लीला गेल्याने चर्चांना उधाण
मुंबईत महत्त्वाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जागावाटपाचा तिढा सोडवणे आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणे, हे या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे 'रिपोर्ट कार्ड' सादर होणार?
या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागील तीन निवडणुकांमध्ये मित्रपक्षांकडून शिवसेनेला (शिंदे गट) न मिळालेले सहकार्य. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक मतदारसंघांमध्ये मित्रपक्षांच्या असहकार्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला, असा ठपका ठेवणारा एक अंतर्गत अहवाल पक्षाने तयार केला आहे. हा 'रिपोर्ट' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांमध्ये अशा चुका टाळण्यासाठी ते आग्रही राहू शकतात.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना खासदारांची बैठक
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली. ही बैठक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. यात अधिवेशनातील विविध कामकाज आणि पक्षाच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा झाली. शिवसेनेच्या खासदारांनी अर्थसंकल्पीय चर्चेत पक्षाची भूमिका कशी मांडायची यावर विचारविनिमय केला. विशेषतः, सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासमोर येणाऱ्या संभाव्य अडचणींवर चर्चा झाली. यात आर्थिक प्रभाव, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि इतर आव्हानांवर केंद्र सरकारच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सखोल विचारमंथन झाले.
एकनाथ शिंदे यांनी बैठकीत पक्षाच्या खासदारांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “अर्थसंकल्पीय अधिवेशन हे देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धोरणांना पाठिंबा देताना शिवसेनेची भूमिका जनतेच्या हिताचीच राहील. विरोधी पक्षाकडून विविध मुद्दे उपस्थित केले जात आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात फेक नॅरेटिव्ह उभे केले जात आहे. शिवसेना एनडीएचा महत्त्वाचा घटकपक्ष असून, विरोधकांच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना आक्रमक आणि रचनात्मक भूमिका घेणार असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय संचलन समितीच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. पाच राज्यातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पाच राज्यातील तिकीट वाटपासंदर्भात केंद्रीय भाजपची पुन्हा खलबतं सुरू झाली आहेत. पाच राज्यातील निवडणुका जाहीर होण्याआधी केंद्रीय संचलन समितीची बैठक पार पडली होती.
