सोलापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीसाठी लढाईच्या तयारीत उतरलेल्या माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात नामदेव पायरीपाशी येऊन नारळ फोडत सावंत यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. पंढरपूर तालुक्यातील शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत वाजत गाजत दत्तात्रय सावंत नामदेव पायरी येथे पोहोचले होते. नामदेव पायरीचे दर्शन घेत त्यांनी आपला प्रचार अधिकृतपणे सुरू केला.
भाजपच्या उमेदवारीची सावंत यांना आशा
संपूर्ण मतदारसंघातील 58 तालुक्यात शिक्षक सहकाऱ्यांनी अशाच रीतीने प्रचाराचे नारळ फोडून प्रचार सुरू केल्याचे सांगताना आपण चळवळीतला कार्यकर्ता असल्याने आपले काम अखंड गेल्या 26 वर्षापासून सुरू असल्याचे सावंत यांनी सांगितले. दत्तात्रय सावंत यांच्या नावाची चर्चा भाजपकडून जोरात सुरू असल्याबाबत त्यांनी भूमिका मांडली. मी चळवळीतला असल्यामुळे भाजप सह सर्वच पक्षाशी एक ठराविक अंतर ठेवून जरी असलो तरी माझ्याशी त्यांची चांगल्या पद्धतीने चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसात याचा निर्णय होईल असे संकेतही दत्तात्रय सावंत यांनी दिले आहे.
दत्तात्रय सावंत हे शिक्षक मतदार संघातून यापूर्वी एकदा निवडून आले असून गेल्या वेळीस देखील ते महायुतीच्या उमेदवारापेक्षा जास्त मते घेऊन दुसऱ्या नंबर वर होते. संपूर्ण मतदारसंघात त्यांचे शिक्षकांशी अतिशय चांगले बॉण्डिंग असून त्यांच्या संघटनेची ताकद मोठी असल्याने यावेळी सावंतांना भाजप उमेदवारी देईल अशी शक्यता आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे उमेदवार लवकरच जाहीर होतील असं म्हटलं होतं. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघ पारंपरिकपणे भाजपचे असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.
महायुतीत पुणे शिक्षकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी तयारी केली आहे. सचिन सानप, कौस्तुभ गावडे यांनी देखील पुणे शिक्षकसाठी तयारी सुरु केली आहे.
Vidhan Parishad Election Schedule: निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
अधिसूचना जारी (Notification Date): 29 सप्टेंबर 2026
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख (Nomination Last Date): 6 ऑक्टोबर 2026
अर्जांची छाननी (Scrutiny): 7 ऑक्टोबर 2026
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Withdrawal Last Date): 9 ऑक्टोबर 2026
मतदानाची तारीख व वेळ (Poll Date & Time): 23 ऑक्टोबर 2026 (सकाळी 8 ते दुपारी 4)
मतमोजणी व निकाल (Counting Date): 27 ऑक्टोबर 2026
