पुणे : राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा (Baramati and Rahuri By Election) पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महत्त्वाचा निर्णय घेत दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. पक्षश्रेष्ठींकडून यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर आली आहे. (Baramati and Rahuri By Election)
दोन्ही मतदारसंघात मित्रपक्षांशी चर्चा करूनच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून, स्थानिक पातळीवरील समीकरणांचा आढावा घेण्यात आला. इच्छुकांची संख्या लक्षात घेता पक्ष नेतृत्व योग्य उमेदवार निवडण्यासाठी काळजीपूर्वक निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन्ही मतदारसंघात मित्रपक्षांशी चर्चा करूनच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस सूत्रांकडून मिळाली आहे.या निर्णयामुळे बारामती आणि राहुरीतील राजकीय लढती अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून, महाविकास आघाडीत जागावाटप आणि रणनीतीबाबतही पुढील घडामोडींना वेग येणार आहे. (Baramati and Rahuri By Election)
आमच्या पक्ष श्रेष्ठीसोबत बोलणं झालं
काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील याबाबत काल माध्यमांशी बोलताना सांगितलं की, राहुरी आणि बारामती विधानसभेबाबत आमच्या पक्ष श्रेष्ठीसोबत बोलणं झालं आहे. यासाठी आमच्याकडे उमेदवारी मागणारे अर्ज आले आहेत. बारामतीसाठी ६ अर्ज आले आहेत आणि राहुरीमधे ४ अर्ज आले आहेत. येत्या २ दिवसांत आम्ही निवडणूक लढण्याबाबत भूमिका जाहीर करू. आज ऑनलाईन मुलाखती देखील झाल्या आहेत, अशी माहिती त्यांनी काल दिली होती.
तर आज समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील बारामती आणि राहुरी पोट निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष उमेदवार देणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. आज दिवसभर उमेदवार निवडण्याची प्रक्रिया पूर्ण करून उद्या माध्यमांसमोर माहिती देणार आहेत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी
महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राहुरी आणि बारामतीसाठी 23 एप्रिलला मतदान होईल तर मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. तर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झालं. यामुळं बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी : 30 मार्च 2026उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026मतमोजणी : 4 मे 2026निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026
