मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी-अंबानी यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे सेल्फ गोल होता. ही भ्रमित व्यक्तीची लक्षणं आहेत. आपण जिंकत नाही, सत्ता निसटत चालली आहे, याची जाणीव झाल्यामुळे पंतप्रधान मोदी (PM Modi) हे व्यथित झाले आहेत. भाजपला (BJP) यंदाच्या निवडणुकीत फारतर 250 जागांवर विजय मिळेल, असे वक्तव्य काँग्रेस (Congress) पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. निवडणुकीत हार-जीत होत असते. पंतप्रधान मोदी यांनी पराभव स्वीकारला पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Lok Sabha Election 2024)


यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या हिंदू-मुस्लीमांच्या मुद्द्यावर भाष्य केले. नरेंद्र मोदींना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नसेल. महाराष्ट्राची जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांवर चालते. शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभावाचे सर्वात मोठं प्रतीक आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. 


पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांनी घाटकोपरमध्ये काढलेल्या रोड शो वर टीका केली. घाटकोपरच्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला. तिकडेच पंतप्रधान मोदींनी रोड शो केला. मोदींमध्ये संवेदना असती तर त्यांनी रोड शोचा रस्ता बदलला असता किंवा तो रद्द केला असता. अथवा त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घ्यायला पाहिजे होती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.


लोकसभा निवडणुकीत भाजपला 250 जागा मिळतील: पृथ्वीराज चव्हाण


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप 220 ते 250 जागा जिंकेल, एनडीएला २७२ हा बहुमताचा आकडाही पार करता येणार नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 2019 मध्ये बहुतांश राज्यांमध्ये भाजपचा परफॉर्मन्स इतका चांगला होता की, आता त्यांना वर जायला जागाच शिल्लक नाही. गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भाजपला वर जायला आता जागाच नाही, त्यामुळे याठिकाणी झाल्या तर भाजपच्या जागा कमीच होतील. याचा फटका भाजपला बसेल. माझ्या मते देशातील सहा राज्यं महत्त्वाची आहेत, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा, या सहाही राज्यात भाजपच्या जागा कमी होतील. परिणामी भाजपप्रणित एनडीए 272 ही मॅजिक फिगर गाठू शकणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.


आणखी वाचा


लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील दोन पक्ष लोप पावणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा