Cockroach Janata Party and Urban Naxal: गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडिया आणि राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीवर (Cockroach Janata Party) आता अप्रत्यक्षपणे एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. अभिजीत दिपके यांनी सुरु केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) थेट शहरी नक्षलवाद्यांशी (Urban Naxal) लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलील, नक्षलविरोधी विभाग आणि गुप्तचर संघटनांना तसा संशय असल्याने त्यादृष्टीने तपासणी सुरु असल्याची माहिती आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत (CJI Suryakant) यांच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ठिणगी पडून सोशल मिडीयावर कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला होता. अल्पावधीतच सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीला प्रचंड पाठिंबा मिळाला होता. यानंतर अचानक कॉक्रोच जनता पार्टीचे इन्स्टा अकाऊंट, ट्विटर अकाऊंट आणि संकेतस्थळावर कारवाई करुन ते बंद करण्यात आले होते. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने नव्या जोमाने उभा राहण्याचा निर्धार व्यक्त केला होता. परंतु, आता कॉक्रोच जनता पार्टीचे थेट शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा संशय सरकारी यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.
सोशल मीडियावरील मोहिमेतून उभं राहिलेल्या "कॉक्रोच जनता पार्टी"ला शहरी नक्षलवाद्यांचा पाठिंबा असल्याचा संशय पोलिसांना आहे. सोशल मीडियावर "कॉक्रोच जनता पार्टी"च्या समर्थनार्थ सुरु असलेल्या मोहिमेला नक्षलवाद्यांच्या "युनायटेड फ्रंट" म्हणजेच शहरी नक्षलवादातील काही वरिष्ठ कॅडरचे सक्रिय समर्थन असू शकते. अवघ्या काही दिवसात लाखांमध्ये सदस्यत्व मिळवणाऱ्या आणि सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टी च्या मोहिमेवर सध्या गुप्तहेर यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलिसांची करडी नजर आहे. या मोहिमेला शहरी नक्षलवाद्यांचा सक्रिय पाठिंबा मिळत असल्याचे प्राथमिक पुरावे त्यांच्या हाती लागले आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मिडियावरील मोहिमेवर स्वार होऊन तरुणांची माथी भडकवण्याच्या आणि स्थापित व्यवस्थेविरोधात बंड उभारण्याच्या आपल्या जुन्या हेतूला साध्य करण्याचा प्रयत्न शहरी नक्षलवाद्यांचे काही नेते करत असल्याचं पोलिस आणि गुप्तहेर यंत्रणांचे अवलोकन आहे. त्यासाठीच नक्षलवाद्यांच्या युनायटेड फ्रंट मधील काही नेते सध्या सक्रियतेने कॉक्रोच जनता पार्टीचा प्रोपोगंडा वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे यंत्रणांच्या लक्षात आल्याचे महाराष्ट्राच्या नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख व स्पेशल आयजी संदीप पाटील यांनी सांगितले.
Cockroach Janata Party: काय आहे पोलीस आणि गुप्तहेर यंत्रणांचे अवलोकन?
* "जेन झी" च्या माध्यमातून सत्तेत बदल घडवण्याचा किंवा त्यांना रस्त्यावर उतरवून क्रांती निर्माण करण्याचा कॉक्रोच जनता पार्टीचा उद्दिष्ट दिसून येतो.* नक्षलवाद्यांची शहरी शाखा मानल्या जाणाऱ्या "युनायटेड फ्रंट" (ज्याला शहरी नक्षलवादी ही म्हटले जाते) चे उद्दिष्ट ही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर तरुणांना उतरून कथित क्रांती घडवण्याचे किंवा स्थापित व्यवस्थेविरोधात बंड उभारण्याचे राहिले आहे.* त्यामुळे पोलिस आणि यंत्रणांनी "कॉक्रोच जनता पार्टी"च्या सर्व गतिविधिवर बारीक नजर ठेवली आहे.* आतापर्यंतचे पोलिस व विविध यंत्रणांचे ऑब्झर्वेशन (अवलोकन) आहे की नक्षलवाद्यांच्या युनायटेड फ्रंट मधील काही सक्रिय नेते कॉक्रोच जनता पार्टीचा प्रोपोगंडा वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.* "जेन झी" यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि ते करणं कसं योग्य आहे असं तरुणांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न काही शहरी नक्षलवादी करताना दिसून येत असल्याचे ही पोलिसांच्या लक्षात आले आहे. * शहरी नक्षलवादाशी जोडलेले काही नेते "कॉक्रोच जनता पार्टी"च्या या मोहिमेवर स्वार होऊन आपले हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ही पोलिस आणि यंत्रणांना वाटत आहे.
आणखी वाचा
