दिल्ली दौऱ्यावर निघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा कस्पटेंना फोन; वैष्णवीच्या वडिलांच्या CM कडे 2 मागण्या
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणावरुन आता सरकार अधिक गंभीर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उद्यापासून दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून तत्पूर्वी त्यांनी पुण्यातील वैष्णवी हगवणेंच्या (Vaishnavi hagawane) वडिलांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन हे वैष्णवी हगवणेंच्या माहेरी गेले होते, तेव्हा त्यांनी वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटेंसोबत मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ कॉलद्वार बोलणं करुन दिले. यावेळी, वैष्णवीच्या वडिलांनी दोन महत्त्वाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केले आहेत. आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडिया यांची नियुक्ती करण्याची मागणी अनिल कस्पटे यांनी केली. त्यावर, वकिलासंदर्भातील मागणी मुख्यमंत्र्यांनी लागलीच मान्य देखील केली आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही (Ajit pawar) वैष्णवीच्या वडिलांची भेट घेतली होती.
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणावरुन आता सरकार अधिक गंभीर झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील व्हिडिओ कॉलद्वारे अनिल कस्पटेंशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. सरकार आपल्या पाठीशी आहे, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान, आरोपींना न्यायालयात कठोर शिक्षा होईल, त्याअनुषंगाने पावलं उचलायला सांगितले आहेत. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल, तातडीनं निकाल लागेल. कारण, ही अतिशय वेदनादायक घटना आहे, असे अजित पवारांनी वैष्णवीच्या वडिलांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले
मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरुन संवाद
हुंड्यासाठी छळ केल्याची अतिशय दुर्दैवी घटना आहे, वैष्णवीचा ज्या पद्धतीने छळ केला, 50 लाख दे नाहीतर भावांना मारून टाकू असं सांगण्यात आलं. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना दुर्दैवी आहेत, असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले. तसेच, पोलीस तपास योग्य दिशेने सुरू आहे, लहान मुलाला घेऊन गेलेला चव्हाण फरार आहे तो आज उद्या सापडेल. आत्ताच मुख्यमंत्री यांचे वैष्णवीच्या वडिलांसोबत बोलणं करून दिलं आहे, कोणत्याही परिस्थितीत कोणीही यातून सुटणार नाही, असे महाजन यांनी म्हटले.
विशेष सरकारी वकिलांची मागणी मान्य
दरम्यान, राजेश कावेडिया यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी मुख्यमंत्री यांच्याकडून केली असून ती मागणी मान्य करण्यात आली आहे. आरोपीवर अतिशय कडक कारवाई केली जाईल, पोलिसांवर जे आरोप झालेत त्याची चौकशी केली जाईल, कोणालाही सोडलं जाणार नाही. मागचे सगळे गुन्हे पाहून पोलिसांकडून हगवणे यांना ताकीद देण्यात आली होती, त्यांचा हा धंदा होता ही विकृती आहे. यापुढे तपास योग्य दिशेने सुरू आहे. मला दोन मुली आहेत हा फोटो पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले, हगवणेंना फाशी झाली पाहिजे
CM फडणवीस दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत नीती आयोग आणि मुख्यमंत्री परिषदेला हजेरी लावणार आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या नीती आयोगाची बैठक होणार आहे. तर रविवारी होणाऱ्या मुख्यमंत्री परिषदेतही देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या इतरही काही बैठकाही होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
वैष्णवीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, लवकर निकाल, अजित पवारांचा कस्पटेंना शब्द; IPS सुपेकरांनाही इशारा
























