Devendra Fadnavis on Kolhapur Expansion: मी असेल, शिंदे साहेब असतील किंवा सुनेत्रा वहिनी असतील, आमचं सगळ्यांचं प्रेम कोल्हापूरवर आहे. पांढऱ्या-तांबड्यावर पण आहे, पण कोल्हापूरवर जास्त आहे, अजितदादांचं तर विशेष प्रेम या कोल्हापूरवर होतं. कोल्हापूरकरांनी आम्हाला असा आशीर्वाद दिलेला आहे की आता जर आम्ही तुमचं काम केलं नाही, तर आमच्यासारखे करंटे कोणीच नाही इतका भरभरून आशीर्वाद दिला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हद्दवाढ करणं फार गरजेचं आहे
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला कोल्हापूरकरांनी दिलं आहे. त्यामुळे या सगळ्या नेत्यांना सांगतो, काही काळजी करू नका, यापूर्वीही कोल्हापूरमध्ये कधी कमी पडू दिलं नाही, यापुढेही कोल्हापूरला कमी पडू देणार नाही, पण यात एक गोष्ट नक्की आहे, मी पण जाता-जाता एक बॉल टाकून देतो हद्दवाढ करणं फार गरजेचं आहे. त्यांनी सांगितले की, शहराचा विकास करायचा असेल, तर गरजेचं असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, हद्दीबाहेरच्या लोकांच्या काही अडचणी आहेत, पण मी लोकप्रतिनिधींना सांगतो, 100 टक्के त्यांच्या अडचणी मी सोडवून देतो, कोणत्याही अडचणी असतील त्या सोडवून देतो, असे आश्वासन त्यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर तसेच कोल्हापूर मनपा महापौर रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित केला होता. मुश्रीफ यांनी कोल्हापूर हद्दवाढीत विरोधात असलेल्या करवीरचे आमदार चंद्रदीप नरके आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांचेही कान टोचले. दोघांनी सहकार्य करावे असे थेट त्यांनी व्यासपीठावरून सांगितले. कोल्हापूरच्या समस्या सोडवण्यासाठी कोल्हापूर मनपाकडून सविस्तर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्यासपीठावरून देण्यात आले.
कोल्हापूरला अधिक सुनियोजित आपल्याला करायचं आहे
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आज बघा, हायकोर्ट आलं, आता त्या हायकोर्टाला शेंडा पार्कला 75 एकर जागा आपण देत आहोत. हायकोर्टमुळे या शहरामध्ये रोज 20-25 हजार लोकं येणार त्यामुळे या शहराला अधिक सुनियोजित आपल्याला करायचं आहे. मागील काळामध्ये हायकोर्टसाठी शेंडा पार्कला आपण जागा दिली, आयटी पार्क करत आहोत. अतिशय सुंदर कन्व्हेन्शन सेंटर करत आहोत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. त्यामुळे मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये आई अंबाबाईच्या आशीर्वादाने निश्चितपणे कोल्हापूर शहराकरता जो-जो विचार आपण सगळ्यांनी केला असेल, तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण याठिकाणी प्रयत्न करू, हा विश्वास मी आपल्याला देतो, असे ते म्हणाले.
हॉकी स्टेडियमसाठी 'खेलो इंडिया'च्या माध्यमातून निधी दिला असून अधिक निधीची गरज असल्यास तो उपलब्ध करून दिला जाईल. कोल्हापुरात भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी जागा उपलब्ध केली असून BCCI च्या माध्यमातून आधुनिक स्टेडियम उभारले जाईल.फुटबॉल प्रेमींसाठीही आवश्यक क्रीडा सुविधांवर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
