नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Devendra Fadnavis: आज मला इथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली, मला एक वर्षापूर्वीच या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. वामनभाऊ यांचा वारसा विठ्ठल महाराज चालवत आहेत.

बीड : राज्यात एकीकडे विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळाचे लक्ष बारामती विधानसभेतील काँग्रेसच्या भूमिकेकडे लागले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आज 94 वा नारळी सप्ताह पार पडत आहे, त्यानिमित्ताने मुख्यमंत्री आले असता, त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं. तसेच, नाशिकमधील आयटी कंपनीत घडलेला प्रकार गंभीर असून सखोल चौकशी करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकमध्ये बेरोजगार तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे आणि त्यानंतर त्यांचे धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकणे, अशी एक भयानक 'मोडस ऑपरेंडी' येथे राबवली जात असल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी, लैंगिक अत्याचारा 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 5 जणांना अटकही झाले आहे. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील याप्रकरणी भाष्य केलं.
नाशिक घटनेचा सखोल तपास होईल
नाशिकमध्ये पोलिसांनी उघडकीला आणलेलं आयटी कंपनीतील प्रकरण अतिशय गंभीर आहे, एखाद्या टेक्निकल कंपनीमधे अशाप्रकारे गोष्टी घडणं धक्कादायक आहे. या सगळ्याचा तपास सखोल केला जाईल, सेही फडणवीसांनी सांगितले.
2039 पर्यंतचे नारळ बुक
बीडमधील कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, आज मला इथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली, मला एक वर्षापूर्वीच या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. वामनभाऊ यांचा वारसा विठ्ठल महाराज चालवत आहेत. त्यामुळे, या गडावर आलं पाहिजे अस वाटतं. आम्ही पदामुळे इथे आलो नाही तर भक्त म्हणून आलो आहोत. इथे कोणीही मोठा नाही, एका विचाराने प्रेरित होऊन आहेत. वेगवेगळ्या गावांनी 2039 पर्यंतचे नारळ बुकिंग करुन ठेवले आहेत, हे असं कुठेच पाहायला मिळत नाही. एका छोट्या गावाने इतका मोठा सप्ताह करायचा ही शक्ती बळ देणारी आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गहिनीनाथ गडावरी नारळी सप्ताहाचे कौतुक केले.
विविध समाजाचे लोक एकत्र येतात, आध्यात्मिक बैठक होते, एक सशक्त समाज बनतो. सर्व काही गोष्टी शिस्तीत होते, वारकरी परंपरा महत्वाची आहे. इतकी आक्रमण झाली पण वारकरी संप्रदाय कधी थांबला नाही, पंढरीला पाऊलं जातातच, असे म्हणत फडणवीसांनी वारकरी संप्रदायाचं महत्त्व अधोरेखित केलं. गहिनीनाथ गडावरुन निघणाऱ्या दिंडीसाठी निघणारा रस्ता होणारच, पंढरपूरला चांगल्या व्यवस्था होतील, गडाचा भक्त म्हणून ते पूर्ण करण्याचं काम करेल, ही परंपरा पुढे नेऊ, सुरेश धस यांनी मागणी केली ती पूर्ण करा अशी मागणी काही भाविकांनी केली. तर, धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करा, अशी देखील मागणी भाविकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
दरम्यान, गोपीनाथ मुंडेसाहेब आणि माझा एकत्र या कार्यक्रमात असलेला शेवटचा फोटो मला भेट मिळाला, मला खूप भरुन आले, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी भावनिक आठवणी सांगितली.
मुख्यमंत्र्यांचा हर्षवर्धन सपकाळांना फोन
राज्यातील पोटनिवडणुकीसंदर्भात बोलताना, मी प्राजक्त तनपुरेंना विनंती केली आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मी हर्षवर्धन सपकाळ यांना देखील फोन करुन विनंती केली होती की त्यांनी उमेदवार मागे घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा





















