मुंबई : राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन पुकारले होते. तर, मुंबईतही सीजेपीचे कार्यकर्ते आझाद क्रांती मैदानावर आंदोलनासाठी एकत्र आले होते. त्यासाठी, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी (Tushar gandhi) हेही आपल्या घरातून क्रांती मैदानाकडे निघाले असता मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. अखेर, 8 तासांच्या स्थानबद्धतेनंतर आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी (Police) त्यांची एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात रवानगी केली होती, अशी माहितीही समोर आली आहे.
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेण्यात आलं होतं. त्यातच, याबाबत माहिती मिळताच खासदार संजय राऊतांसह आमदार आदित्य ठाकरेंनी पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना इशारा दिला होता. जोपर्यंत तुषार गांधी यांना सोडून दिले जात नाही, तोपर्यंत पोलीस स्टेशन न सोडण्याचा इशारा आदित्य यांनी दिला होता. त्यानंतर, अखेर 8 तासांनी तुषार गांधींची सुटका करण्यात आली. तुषार गांधी 8 तासांहून अधिक वेळ मुंबई पोलिसांच्या ताब्यात होते, आदित्य ठाकरे येणार कळताच मुंबई पोलिसांनी तुषार गांधी यांना दुसऱ्या पोलीस स्थानकात फिरवलं. गांधी यांना वांद्रे येथून ताब्यात घेतल्यानंतर आधी डी.एन.नगर पोलीस स्थानकात ठेवण्यात आले होते. मात्र, संध्याकाळी आदित्य ठाकरे त्यांना सोडविण्यासाठी पोलीस स्थानकात येणार कळताच, वैद्यकीय तपासणीचे कारण देत पोलिसांनी तुषार गांधी यांना मागच्या बाजूने काढून बोरिवली पोलीस स्थानकात नेण्यात आले. संध्याकाळी साडे चार ते पाच वाजताच्या सुमारास त्यांना डी.एन. नगरकडून बोरिवली पोलीस स्टेशनला नेण्यात आले होते. अखेर, स्वत: बोरिवली पोलीस तुषार गांधी यांना घेऊन, त्यांच्या घरी जात आहेत. तब्बल 8 तास डिटेन केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
दरम्यान, दुसरीकडे मुंबईतील डी.एन. नगर पोलिसांनी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्याने ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली होती. जोपर्यंत तुषार गांधी यांना सोडण्यात येणार नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस स्थानकातून बाहेर जाणार नाही, असा पवित्रा आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतला होता. मुंबईतील सगळे शिवसैनिक हे या पोलीस स्थानकाबाहेर जमतील, आदित्य ठाकरेंनी पोलिसांसोबतच्या चर्चेत भूमिका मांडल्याने पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या आणि गांधीची सुटका केली.
सोलापुरात मशाल मोर्चा
दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाचे राज्यातील विविध जिल्ह्यात पडसाद दिसून आले, सोलापुरात पडसाद पाहायला मिळाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने सोलापुरात मशाल रॅली काढून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते जिल्हा परिषदपर्यंत मशाल रॅली काढण्यात आली. ‘डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात येतोय, सीजेपीच्या नेतृत्वाला विमानातून अटक करण्यात येते, ही देशात निर्माण झालेली अघोषित आणीबाणीची परिस्थिती आहे, देशभरात जिथे पोलीस अडवतील तिथं आंदोलन होतील’, असा इशाराही माकपाने यावेळी दिला. ज्ञानेश कुमार एवढे प्रिय असतील तर मोदी शहा यांचा राजीनामादेखील आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही’, असाही इशारा मार्क्सवादी पार्टीचे नेते एम.ए.शेख यांनी दिला.
