शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला! छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेपासून जिल्हापरिषदपर्यंत भाजपची सत्ता भक्कम
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप- शिवसेना युती झाली आहे. एकूण 63 जागा असून, त्यात 25 जागा शिवसेना, 27 जागा भाजप लढवणार आहे.

Chhatrapati Sambhajianagar: छत्रपती संभाजीनगर हे शिवसेनेचं बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं. महापालिका असो वा जिल्हापरिषद, गेली अनेक वर्षे या भागावर शिवसेनेचा भगवा फडकत होता. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या या शहरात ग्रामपंचायतीपासून ते आमदारकीपर्यंत शिवसेनेचंच वर्चस्व होतं. मात्र आता हाच बालेकिल्ला भाजपने काबीज केल्याचं स्पष्ट चित्र समोर येत आहे. सध्या महापालिकेत भाजपची निर्विवाद सत्ता आहे. एवढंच नाही तर जिल्ह्याच्या राजकारणातही भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे जिल्ह्यात पालकमंत्री, एक खासदार आणि 9 पैकी 6 आमदार असले तरी जिल्हापरिषदेत मात्र सेनेला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप- शिवसेना युती झाली आहे. एकूण 63 जागा असून, त्यात 25 जागा शिवसेना, 27 जागा भाजप लढवणार आहे. तर सिल्लोड विधानसभा क्षेत्रातील जागा दोन्ही पक्ष मैत्रीपूर्ण लढत आहेत. ज्या गटात जो पक्ष निवडणूक लढेल त्या गटातील पंचायत समिती देखील तोच पक्ष लढवेल.
शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला!
आकडेवारी पाहिली तर हा बदल अधिक ठळकपणे समोर येतो. 2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे 23 नगरसेवक होते, तर आताच्या निवडणुकीत भाजपचे तब्बल 57 नगरसेवक निवडून आले आहेत. दुसरीकडे, तेव्हा 31 नगरसेवक असलेली शिवसेना आज एकनाथ शिंदे गटाचे केवळ 13 नगरसेवकांपर्यंत मर्यादित राहिली आहे. जिल्हापरिषदेतही असेच चित्र दिसतं. मागील गट निवडणुकीत भाजपचे 23 सदस्य होते, तर आता भाजप आणि भाजप पुरस्कृत मिळून 25 सदस्य आहेत. तर शिवसेनेची संख्या 18 वरून पुरस्कृत सदस्य धरून 22 पर्यंत पोहोचली असली, तरीही सत्ता स्थापनेसाठी ती अपुरी ठरली आहे.
महापालिका ते जिल्हापरिषद भाजपची सत्ता भक्कम
भाजप नेत्यांच्या मते, पूर्वी भाजपला दुय्यम वागणूक दिली जात होती, मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. भाजपचं बूथ-स्तरीय नियोजन, संघटनात्मक मजबुती आणि शहरी मतदारांचा वाढता कल याचा थेट फायदा भाजपला मिळाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. दरम्यान, शिवसेनेतील फूट, संघटनात्मक कमकुवतपणा आणि बदलतं शहरी राजकारण यामुळे बालेकिल्ला ढासळल्याचं स्पष्ट होत आहे. इतिहासात पहिल्यांदाच मतदारांसमोर सेना आणि भाजप असे दोन स्पष्ट पर्याय होते आणि मतदारांनी भाजपला पसंती दिली.
शहरासोबतच ग्रामीण भागातही सेनेचा प्रभाव कमी होताना दिसतोय. हा बदल केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नसून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा हा ट्रेलर असल्याचं मानलं जात आहे. एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला आज ढासळताना दिसतोय आणि त्याच ढिगाऱ्यावर भाजप आपली सत्ता अधिक भक्कम करत असल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

























