महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगर पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यात! सतीश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब
पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरताना मंत्री बाबासाहेब पाटील, संजय शिरसाट, पंकजा मुंडे आणि अतुल सावे उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार विक्रम काळे यांनी दिली.

Chhatrapati Sambhajinagar: मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सतीश चव्हाण (Satish Chavan) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सतीश चव्हाण आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. या उमेदवारीमुळे मराठवाड्यातील पदवीधर मतदार संघाच्या राजकारणाला वेग आला आहे. या मतदारसंघातील लढत यामुळे रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक महासंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली असून 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगर पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यात पडली आहे. माजी आमदार सतीश चव्हाण यांनी आज दुपारी 12:30 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचा सांगण्यात आले.संभाजीनगर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सतीश चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून पक्षाकडून सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीचे पत्रही जाहीर करण्यात आले आहे. पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरताना मंत्री बाबासाहेब पाटील, संजय शिरसाट, पंकजा मुंडे आणि अतुल सावे उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार विक्रम काळे यांनी दिली.

राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाणांना जबाबदारी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या जागांसाठी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांनी याआधी तीन टर्म प्रतिनिधित्व केले होते. 2008,2014, 2020 मध्ये प्रतिनिधित्व केल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (A.P) पक्षाने पुन्हा एकदा सतीश चव्हाणांवर ही जबाबदारी सोपवली आहे. पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्याचे अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, छत्रपती संभाजी नगरच्या मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे उमेदवार आणि माजी आमदार सतीश चव्हाण म्हणाले 'मला आनंद आहे, तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांचा विश्वास मी नक्की सारखं ठरवेल. या मतदारसंघात निवडून आल्यानंतर पुढच्या निवडणुकीला सामोरे जाताना मी मागच्या निवडणुकींचा आढावा घेत होतो. सहा वर्षात काम केल्याचा लेखाजोखा मी मांडत होतो तसंच याही वेळेस जसजशी सामाजिक व्यवस्था अर्थव्यवस्था बदलते, तसे नवे प्रश्न उद्भवतात. या मतदारसंघातील लोकांना कायम हे प्रश्न सोडवण्यासाठी सजग राहावे लागते. असे सतीश चव्हाण म्हणाले.
Before You Go
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?























