Chhagan Bhujbal on Maratha Reservation GR : एका तासामध्ये दोन-दोन जीआर निघाले. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाच्या सचिवांची सही देखील आहे. पहिल्या जीआरवर  मराठा समाजाच्या 'पात्र' व्यक्तींना म्हटले. जरांगेंनी ऑब्जेक्शन घेतले अन् पात्र शब्द काढायला सांगितला. त्यानंतर दुसरा जीआर काढला. त्यात पात्र शब्द काढला गेला. जर चुकीचं होत असेल तर मी कसं काय गप्प राहू शकतो? मी माझे मत मांडणार, असा इशारा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्य  सरकारला दिला आहे. एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) भाष्य केलंय. 

Continues below advertisement


मराठा आरक्षणाला नवीन काय मिळाले? याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, जिथे एका घरामध्ये दहा लोक राहतात त्यांना बाहेर काढलेले नाही. मात्र आणखी दहा लोक त्याच घरात बसवलेले आहेत. यामुळे धक्का लागणारच ना. ओबीसींना आरक्षणाच्या रूपाने राजकारणात, शिक्षणात, नोकरीत जे मिळत आहे त्यातला मोठा वाटा आता निघून जाणार आहे. मराठा समाज ही रुलिंग कम्युनिटी आहे. हायकोर्टाने देखील दोन ठिकाणी सांगितले आहे की, कुणबी आणि मराठा या दोन्ही वेगवेगळ्या जाती आहेत. सुप्रीम कोर्टाने देखील तुम्ही आर्थिक दृष्ट्या मागास असाल, शैक्षणिकदृष्ट्या मागास असाल. पण सामाजिक दृष्ट्या तुम्ही मागास नाहीत, त्यामुळे तुम्हाला आरक्षण देता येणार नाही असे म्हटले आहे.


सरसकट शब्द काढून शब्दांची हेराफेरी


आता वर्षा दोन वर्षापासून सुरू आहे की, मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या. सरसकट शब्दाला कोणी देखील ऑब्जेक्शन घेणार. त्यामुळे सरसकट शब्द काढून शब्दांची हेराफेरी केली आणि द्यायचे ठरवले. म्हणून तर ते (मनोज जरांगे) परत गेले, गुलाल उधळला गेला, असे छगन भुजबळ म्हटले. 


कोर्टाच्या निरीक्षणाचा दाखला


छगन भुजबळ पुढे म्हणाले की, 2019 पूर्वी मराठा समाजाचे मोर्चे निघाले. गुज्जर समाजाचे मोर्चे निघाले. जाट समाजाचे निघाले. यानंतर मोदी साहेबांनी ईडब्ल्यूएसचा वर्ग निर्माण केला. त्याच स्पष्ट म्हटले आहे की, या देशातले काही समाज हे आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत. परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नसल्याने ते 50 टक्क्यांमध्ये जाऊ शकत नाहीत. म्हणून त्यांच्यासाठी आम्ही ईडब्ल्यूएस निर्माण करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. हे दिल्यानंतर गुजरात, राजस्थानमधील आंदोलने थांबली. पण, त्यात दहा टक्क्यांमध्ये देखील एकटा मराठा समाज हा आठ टक्के आहे. हे झाल्यानंतर सुद्धा त्यांचा आग्रह असा आहे की, मराठा आरक्षण पाहिजे. मग आणखी दहा टक्के मराठा आरक्षण देण्यात आले. त्यानंतर ते म्हणाले आम्हाला ओबीसीचे आरक्षण पाहिजे, असे त्यांनी म्हटले.  


दिशाभूल करू नका


ज्या वेळेला हे जीआर आले त्यावेळेस आम्ही वाचल्यानंतर समजले की, यात गडबड आहे. एक दिवस अगोदर मला मुख्यमंत्र्यांनी बोलावले होते. तेथे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री होते. आता ते सांगतात की आम्ही त्यांना सांगितले होते. त्यांनी मला सांगितले की, सरसकट शब्द काढला आणि हैदराबाद गॅझेट आपण लागू करण्याचे ठरवले आहे. मग मी हैदराबाद गॅझेटचा उल्लेख दाखवत सांगितले की, कुणबी आणि मराठा वगैरे आहेत. जे कुणबी आहेत त्यांना द्यायला माझे काहीच हरकत नाही. पण भुजबळ यांना विचारून जीआर काढला अशी दिशाभूल करू नका, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 


एका तासात जीआरमध्ये बदल होतो का?


हे परिपत्रक काढण्याआधी हरकती मागवल्या पाहिजे. मंत्र्यांची समिती हा निर्णय कसा काय घेऊ शकते? हा माझ्या मनातला प्रश्न आहे. एका तासामध्ये दोन-दोन जीआर निघाले. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाच्या सचिवांची सही देखील आहे. त्यात मराठा समाजाच्या 'पात्र' व्यक्तींना म्हटले. जरांगेंनी ऑब्जेक्शन घेतले अन् पात्र शब्द काढायला सांगितला. त्यानंतर दुसरा जीआर काढला. त्यात पात्र शब्द काढला गेला. जर चुकीचं होत असेल तर मी कसं काय गप्प राहू शकतो? मी गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. मी माझे मत मांडणार, एका तासात कधी कुठल्याही जीआरमध्ये बदल होतो का? आता हे दबावाखाली होत आहे की हे प्रेमाखाली होत आहे? असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.  



आणखी वाचा 


Manoj Jarange Patil: यावरून ओळखायचं मराठे जिंकले आहेत, छगन भुजबळांच्या विरोधावर मनोज जरांगे काय म्हणाले? संजय राऊतांच्या फडणवीस कौतुकावरही बोलले