नाशिक :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सध्या काहीही आलबेल नसून राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन प्रशांत किशोर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, प्रदेशाध्यक्षपद बदलाचेही सूचवल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे, या भेटीनंतर सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनीही प्रतिक्रिया दिली असून मी आठवेळा महाराष्ट्र उलथापालथा केला आहे. राज्याचा कानाकोपरा मला माहिती आहे. ते रणनीतीकार असतील, पण ते आमच्या पक्षासाठी काम करतात की नाही याची मला माहिती नाही, असे सुनील तटकरेंनी सांगितलं. आता, छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिल आहे.
सुनील तटकरे यांनी प्रशांत किशोर यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. अजितदादा आणि इतर नेत्यांसोबत मी काम केलं आहे. मी माझ्या आयुष्यात निवडणुकीचा सर्व्हे कधीही केला नाही. मला काय असल्या रणनीतीकार किंवा सर्व्हेची गरज नाही. मी फिल्डमध्ये काम करणारा आहे. गावातल्या लोकांना, तरुणाईला भेटल्यानंतर मला अंदाज येतो. मी आठवेळा महाराष्ट्र उलथापालथा केला आहे, असे उत्तर तटकरे यांनी दिले होते. तसेच, प्रशांत किशोर यांची नेमणूक झाली असती तर त्याची माहिती मला असती, असंही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. आता, छगन भुजबळ यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली.
मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीबद्दलही आपलं मत मांडल. प्रशांत किशोर भेटले असतील, आम्हालाही भेटतात. मात्र, त्यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली असे मला वाटत नाही. नवीन म्हणून ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना येऊन भेटले. त्यांच्याशी चर्चा केली त्यात मला काही वावगं वाटत नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
म्हणून तटकरे-पटेल भेटीवेळी नव्हते
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सध्या दिल्लीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा अधिवेशन सुरू असल्याने तिथं गुंतलेले आहेत. त्यामुळे, ते मुंबईमध्ये देवगिरी येथे कदाचित जाऊ शकले नसतील. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या आठवड्यात ती भेट झालेली आहे, त्याची चर्चा पण झालेली आहे. एखाद्या गोष्टीची फोनवर पण चर्चा होत असते, त्यामुळे एवढे काही सिरीयस घ्यायचे असे वाटत नाही, असे स्पष्टीकरण देखील या भेटीत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंच्या अनुपस्थितीवर भुजबळांनी दिले.
दरम्यान, कुठल्याही राजकीय सल्लागाराची गरज नाही, असे सुनील तटकरेंनी म्हटलं. त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे, सुनेत्रा पवार त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे, त्यांनी कोणाला भेटायचे, कोणाला नाही भेटायचं हे त्या ठरवतील ना. त्यासाठी त्यांना आमच्या परवानगीची गरज नाही, असेही भुजबळांनी स्पष्ट केले.
