Chhagan Bhujbal NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्या सूचक आणि अर्थपूर्ण वक्तव्यांची मालिका सुरु ठेवली आहे. गेल्या 26 वर्षांमध्ये राजकारणात काहीजण मेहनतीने पुढे आले आहेत. सगळेच कष्ट आणि मेहनत करत असतात. मात्र, काहीजण कष्ट न करता देखील पुढे जातात. पक्षासाठी एक-एक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. आपापसात मतभेद होतात तेव्हा आपण घर सोडत नाही, आपण मतं मांडतो, असे भुजबळ यांनी म्हटले. भुजबळ यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने आहे, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा (Sunetra Pawar) वहिनींच्या नेतृत्त्वाखाली मोठी प्रगती करेल, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics News)

छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छूक होते. मात्र, त्यांनी आपले पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याची अट घातली होती. भाजपकडून यासंदर्भात लगेच निर्णय होऊ न शकल्याने छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाणे टाळले होते. त्यामुळे राष्ट्रवादीने राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांना उमेदवारी दिली होती. यानंतर बोलताना छगन भुजबळ यांनी पक्षातील इतर नेत्यांच्या मुलाबाळांना जो न्याय आहे, तो मला मिळावा, अशी इच्छा बोलून दाखवली होती. यानंतर छगन भुजबळ यांनी बुधवारी पुन्हा एकदा सूचक वक्तव्यं केली आहेत. नमस्कार ताकदीला होतो, चमत्काराला होतो. तुमच्या पाठी आमदार किती, खासदार किती, नगरसेवक किती यावर सगळे निर्भर असते, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

Chhagan Bhujbal News: पक्ष सगळ्यांना न्याय देण्याचे काम करतो: छगन भुजबळ 

अजित पवार सोडून गेले, त्यानंतर सुनेत्रा ताई पुढे आल्या आहेत. अनेकांना वाटतं आम्हाला पक्षाने काही दिलं नाही. प्रत्येकाने काम करत राहिले पाहिजे. पदं कमी असतात, पण पक्ष सगळ्यांना न्याय देण्याचे काम करत असतो. एकजुटीने काम करत राहावे, असं सांगतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी साजरा होणार आहे. यावेळीही भुजबळ काय बोलणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला आहे.

आणखी वाचा

Sunil Tatkare On Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'

इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?