नाशिक : दिवंगत नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या अस्थी कलशाचे विविध जिल्ह्यात दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला येथेही मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांकडून अजित पवारांना आदरांजली वाहण्यात आली. तत्पूर्वी छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर भाष्य केलं. त्यामध्ये, दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनकरणाच्या मुद्द्यावरुन छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली. दोघे ठाकरे जसे एकत्र आले तसे पवार एकत्र यावे. परंतु, अशा काही चर्चा झाल्या नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले. माझ्याशी कधीही हे बोलले नाही, कल्पनाही नाही, असे भुजबळ यांनी म्हटले. तसेच, विलीनीकरणाबाबत भाजपला विचारावं लागेल, असेही त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत जे काही करायचे ते आम्हाला भाजपसोबत राहून करायचे आहे. असं काही करायचे असले तर त्याबाबत आम्हाला भाजपला विचारावे लागेल. कोणाला घ्यायचे, कोणाला नाही घ्यायचे याबाबत भाजपचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांनाही विचारावं लागेल. काय बोलणं झाले हे किंवा बोलणे झाले असेल, काय बोलणे झाले हे माझ्यासहीत कोणालाही माहीत नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांना तर विचारावेच लागेल ना, ज्यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना तर विचारावे लागेल ना, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी आपली परखड भूमिका मांडली. जर सरकारमधून बाहेर पडायचे असेल, NDA बरोबर जायचं असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. मात्र, असा विचार दादांनी केला असेल हे कदापिही आम्हाला वाटत नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. आम्ही उपमुख्यमंत्र्यांची निवड केली, आता त्यांचे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात चर्चा होतील ना, आजच व्हायला पाहिजे, उद्याच व्हायला पाहिजे असे काही नाही. राजकारणाच्या गोष्टी कधी होतात, कधी नाही होतात, असे म्हणत सुनेत्रा पवार यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा होईल,असे भुजबळ यांनी सूचवले.
सुनेत्राताईंना याची काही माहिती होती का?
शशिकांत शिंदेंनी अजित दादांची शपथ घेऊन विलीनीकरणाची चर्चा झाल्याचं सांगितलं. त्यावर, बरं! झालं असेल, परंतु आता परिस्थिती बदलली, नेते बदलले आहेत. सुनेत्राताईंना घरात याची काही माहिती होती का? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. तसेच, आता त्यांच्या नेतृत्वात बाकी नेते देखील चर्चा करतील. शेवटी हा निर्णय सामुदायिक रीतीने घ्यावा लागेल. तसेच, त्या निर्णयाच्या पाठीमागे भाजपला सुद्धा उभे राहणे आवश्यक आहे, असे मत छगन भुजबळ यांनी मांडले.
दरम्यान, येवल्यात अजित पवार यांचा अस्थीकलश घेऊन भुजबळ कुटुंबीय आले असून समीर आणि पंकज भुजबळ यांनी अस्थी कलश अजित पवारांच्या प्रतिमेसमोर ठेवला आहे. अस्थीचे दर्शन घेतल्यानंतर रामकुंडात अस्थी विसर्जन केले जाणार आहे.
