अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशाप्रमाणे गट नेता म्हणून माझी निवड करण्यात आली आहे. तर, विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात हा गट तयार झाला आहे.

चंद्रपूर: काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाल्यानंतरही गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर (Chandrapur) काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली होती. अखेर, दिल्ली दरबारी सर्व नगरसेवकांना नेऊन हा वाद संपुष्टात आल्यानंतर आज नागपूरमध्ये (Nagpur) जाऊन काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांची गटनोंदणी करण्यात आली. तर, गटनेतेपदावर राजेश अडुर यांची निवड करण्यात आली असून महापौर हा वरिष्ठांच्या आदेशानुसार ठरवला जाईल, असे त्यांनी म्हटले. तसेच, काँग्रेसची (Congress) प्रक्रिया (रणनीती) म्हणून दोन ते तीन फॉर्म आमच्या काँग्रेसचे नगरसेवकांनी भरले आहेत, ते वेळेवर मागे घेतले जाईल. मात्र, महापौर कोण होईल हे आमचे नेते ठरवतील. सर्व उमेदवार काँग्रेसचे आहेत, आता कोणीही कोणत्या गटाचा नाही. सर्व 27 नगरसेवक एकसोबत आहेत. आता कुठलाही वाद नाही, कधी कोणताही वाद नव्हता, सर्व आनंदी वातावरण आहे, असे अडुरे यांनी म्हटले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशाप्रमाणे गट नेता म्हणून माझी निवड करण्यात आली आहे. तर, विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात हा गट तयार झाला आहे. या गटात काँग्रेसचे सर्व 27 नगरसेवक सहभागी आहेत. आता, महापौरपदाची उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवणार आहेत. मात्र, महाविकास आघाडी आमच्या सोबत असून ठाकरे गट आमच्यासोबतच राहील असा विश्वास राजेश अडुर यांनी व्यक्त केला. जनविकास सेनाही आमच्यासोबत आहे, आम्ही सर्व मिळून महाविकास आघाडीचा महापौर करू, असेही अडुर यांनी सांगितले.
आमची सत्ता पाच वर्षासाठी राहिल
चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवक एकत्रितरित्या त्यांच्या गट नोंदणीसाठी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले, तिथं 27 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यात आली. काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर राजेश अडुर यांची काँग्रेसचे गटनेते म्हणून निवड झाली आहे. येथे काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर या दोन नेत्यांच्या गटात नगरसेवकांची विभागणी झाली होती. त्यामुळे, चंद्रपूर महापालिकेत सातत्याने ट्विस्ट पाहायला मिळाला. अखेर दोन्ही गट एकत्र आल्याने आता महापौर कोण होणार, ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला पाठिंबा देणार का हे पाहावे लागेल.
काँग्रेसकडे स्वतःचे 27 नगरसेवक
काँग्रेसकडे स्वतःचे 27 नगरसेवक आहेत. स्थानिक विकास आघाडीचे 3 नगरसेवक, एमएमएमचा 1 व बसपा 1 असे मिळून 32 नगरसेवक असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. मात्र, उबाठा व स्थानिक विकास आघाडी ही स्वतः महापौर पदाच्या शर्यतीत आहे. काँग्रेस हाय कमांडने काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाला यातून मार्ग काढण्याची जबाबदारी सोपवली असून प्रदेश नेतृत्वाची भिस्त विजय वडेट्टीवार यांच्यावर आहे. राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या चंद्रपुरतील सत्तास्थापनेबाबत मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत महापौर पदासाठी काँग्रेस आणि भाजपशी महापौर पदासाठी चर्चा सुरू असलेल्या उबाठा शिवसेनेनेही महापौरपदासाठीचा अर्ज भरला आहे.
शिवसेना उबाठाच्या भूमिकेकडे लक्ष
चंद्रपूरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भूमिकेमुळं प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. चंद्रपूरच्या स्थानिक उबाठा पदाधिकाऱ्यांनी अशी अट टाकली आहे, की प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर असेल तर आम्ही काँग्रेसला समर्थन देणार नाही. काँग्रेसकडून धानोरकर गटाच्या चार नगरसेवकांनी महापौर पदासाठी अर्ज भरला आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या महापौर, उपमहापौर पदाला घेऊन काँग्रेसचा अंतर्गत संघर्ष संपलेला दिसत असला तरी काँग्रेसला आपला महापौर बनवू शकेल का? हा प्रश्न अजूनही कायम आहे.
























