Chandrapur News : चंद्रपूर महानगरपालिकेसाठी निवडून आलेल्या काँग्रेसच्या 27 पैकी 13 नगरसेवकांना सोबत घेत शुक्रवारी संध्याकाळी खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात गटाची नोंदणी केली. विशेष म्हणजे या घडामोडीची माहिती कळताच विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) समर्थकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात जात ही प्रक्रिया प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या पत्राला अनुसरण नाही, अशी विभागीय आयुक्तांकडे भूमिका मांडली. त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या परस्पर दाव्यामुळे आता विभाग आयुक्त याबाबत मंगळवारी आपला निर्णय देणार आहेत.
दरम्यान, याआधी काल (शुक्रवारी) दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर संध्याकाळी काँग्रेस पक्षात उघड फूट पडली. खासदार प्रतिभा धानोरकर अचानक संध्याकाळी काँग्रेसच्या 13 नगरसेवकांना घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात गेल्या आणि त्यांनी काँग्रेसच्या गटाची स्थापना केली. काल नागपुरात आलेले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून गटनेता पदी लवकरच आपण नाव पाठवू, असं सांगितलं होतं. मात्र काँग्रेसच्या गटनेतापदा बाबत एकमत न झाल्यामुळे संध्याकाळपर्यंत गटाची नोंदणी अडली होती. विजय वडेट्टीवार यांच्याकडून गटनेता पदासाठी देण्यात आलेल्या वसंता देशमुख यांच्या नावाला प्रतिभा धानोरकर यांचा विरोध होता.
तर प्रतिभा धानोरकर यांच्याकडून देण्यात आलेल्या सुरेंद्र अडबाले यांच्या नावाला वडेट्टीवारांचा विरोध होता. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेत्याचं नाव शेवटपर्यंत निश्चित करू शकले नाही. मात्र संध्याकाळी प्रतिभा धानोरकर यांनी अचानक उचललेल्या या पावलामुळे काँग्रेस मधली घटनाची आता टोकाला गेली आहे तर दुसरीकडे काँग्रेसमधील या गटबाजीचा आणि गोंधळाचा फायदा भाजप उचलू शकते.
13 नगरसेवकांकडून सुरेंद्र अडबाले यांची गटनेता म्हणून निवड
एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्याच आदेशावरून गट स्थापन केल्याचा दावा प्रतिभा धानोरकर यांच्या गटाकडून करण्यात आला. यासाठी रीतसर विभागीय आयुक्त कार्यालयात 27 लोकांच्या नावाचे पत्र धानोरकर गटाकडून देण्यात आले. त्याचबरोबर गटनेता म्हणून सुरेंद्र अडबाले यांचे नावे देण्यात आलं. मात्र दुसरीकडे विजय वडेट्टीवार किंवा त्यांच्या गटाकडून धानोरकर गटाला विरोध केलाय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पंजा चिन्हावर 27 नगरसेवक निवडून आले आहे. यापैकी 13 नगरसेवकांनी सुरेंद्र अडबाले यांची गटनेता म्हणून निवड करून गट स्थापनेचा दावा केला.
मात्र 27 नगरसेवकांपैकी 13 नगरसेवकांचा गट हा अल्पसंख्याक ठरतो आहे. त्यामुळे 14 नगरसेवक किंवा सर्वानुमते गटनेत्याची निवड होणार नाही, तोपर्यंत या अल्पमतात असलेल्या गटास मान्यता देवू नये, असे पत्रच विजय वडेट्टीवार गटाने विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होत दिले आहे. त्यावर 14 जणांच्या स्वाक्षऱ्या सुद्धा आहे.
चंद्रपूर : एकूण नगरसेवक 66 (Chandrapur Election 2026 Result)
सध्याचे संख्याबळ
भाजप – 23
काँग्रेस – 27
काँग्रेस समर्थित जनविकास सेना – 3
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 6
वंचित - 2
बसपा - 1
शिवसेना (शिंदे गट) – 1
अपक्ष – 2
एमआयएम – 1
ही बातमी वाचा:
