मुंबई : देशाची राजधानी दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या सीजेपीचं (CJP Protest) आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आंदोलन शांत झालं, मात्र हे आंदोलन संपलं तरी देखील या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप होत झाल्याचे चित्र दिसून येत आहे, अशातच काल(गुरूवारी, ता30) रोजी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून आज राज्याच्या वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. आंदोलनामध्ये जे दगड वापरले गेलो होते, त्याच्यावरचे ठसे आधारकार्डशी लिंक केले जाणार असून त्याआधारे तपास केला जाणार असल्याच्या संदर्भातील एका वक्तव्यांचा त्यांनी उच्चार केला होता. मात्र चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant patil) वक्तव्यावरती शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल करत त्यांना पुरस्कार द्यावी असंही मिश्किलपणे म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस मुख्यमंत्री फडणवीस यांनी करावी, त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का ते पहावं, असं म्हणत राऊतांनी पाटलांना डिवचलं आहे.
आज माध्यमांशी बोलताना म्हटलं की, चंद्रकांत पाटील जे बोलले, त्याबद्दल मी ते वाचलं. चंद्रकांत दादा हे उच्चशिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. त्याच्यामध्ये विज्ञान वगैरे हे विषय येतात. चंद्रकांत पाटील यांनी हे जे नवं संशोधन केलेलं आहे, आंदोलनतील दगड, त्यावरचे ठसे घेतले जातील ते ठसे आधार कार्डला लिंक केलं जाईल, या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे. चंद्रकांत पाटील यांना या वर्षीचा विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा, चंद्रकांत पाटील यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का?, याचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण इतका मोठा शोध आत्तापर्यंत कोणीही लावला नव्हता. दगडावरील हातांचे ठसे घेऊन, ते आधार कार्डला लिंक करायचे, आधार कार्डा शोध केला ते नंदन निलेकणी जे आहेत, ते हा शोध ऐकून 2 दिवस कोमात गेले, हा नवीन शोध आहे, काय करावं ते काही त्यांना सुचत नाही. मला कसं नाही हे समजलं, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला. (Chandrakant patil)
Sanjay Raut : त्यांच्या पक्षात सगळे दगड भरलेत
यापूर्वीही चंद्रकांत पाटील यांनी दगडाबद्दल विधानं केली आहेत. त्यांचा दगडाशी फार संबंधं आहे. छातीवर दगड ठेऊन, रस्त्यावरचे दगड घेऊन… काय ते कळलं नाही. त्यांच्या सारख्या ज्ञानी महापुरूषाचा दगडाशी फार संबंध आहे, याचा अर्थ असा आहे की , त्यांच्या पक्षात जे सगळे दगड-धोंडे आलेले आहेत, बिनडोक, त्याचा हा परिणाम दिसतोय, अशी तिखट टीकाही संजय राऊत यांनी केली. त्यांना विज्ञानातला नोबेल पुरस्कार देणं गरजेचं आहे, नाहीतर देश एका मोठ्या वैज्ञानिकाला मुकेलं, असाही टोला त्यांनी पुन्हा लगावला.
Sanjay Raut : अमित शाहांच्या पुणे दौऱ्यावर बोलताना राऊत म्हणाले...
अमित शाहांच्या पुणे दौऱ्यावर बोलताना राऊत म्हणाले पुणेकरांच्या भावना आम्ही व्यक्त केल्या, आता म्हणतात तुम्ही कोण पुणेकर, आम्ही टिळक भक्त आहोत, आमच्यासारखे लोक हे टिळक भक्त आहेत, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल या परंपरेला मानणारे आम्ही लोक आहोत, आणि टिळकांचा जहालपणाच आम्ही आमच्या लेखणीतून, वाणीतून, लिखाणातून सातत्याने व्यक्त केलेला, त्याच्यामुळे टिळकांच्या संदर्भात एक भूमिका व्यक्त करण्याचा अधिकार आमच्यासारख्या लाखो तरुणांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे.
Chandrakant patil : चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?
दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि बॅलेटगन हल्ल्यामुळे गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी आणि अभिजीत दीपके यांनी केली आहे. त्यावर, भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. लोकशाहीची सुंदरता अशी आहे की, तुम्ही देखील आरोप करू शकता, ते तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. आरोप केले म्हणजे ते सर्व खरं असतं असं नाही. दिल्ली पोलिसांनी फार मोठा रिपोर्ट तयार केला आहे, तो पाहिला तर आपल्याला चक्कर येईल. पोलिसांना ज्यांना पकडलं ते कोणकोणत्या गुन्ह्यात होते, त्याचं पोलिसांनी विश्लेषण केलं आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच, एका मुक्त पत्रकाराने त्यांच्या व्हिडिओत माहिती दिल्याचे सांगत पाटील यांनी दिल्ली पोलिसांकडून अॅडव्हान्स तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. या व्हिडिओतील माहितीनुसार, पोलिसांनी सांगितलं की, जंतरमंतर परिसरात पडलेले प्रत्येक दगड उचलले आहेत, त्या दगडावर असणारे फुट प्रिंट आधारशी लिंक होतील, असा अजब दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. एका बाजूने राहुल गांधी आरोप करत आहेत की, अमित शहा यांनी हा लाठीचार्ज करायला लावला. मात्र, दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आकडेवारी दिली आहे. याबाबत पोलिसांना देखील प्रूव्ह करावं लागेल आणि राहुल गांधी यांना देखील प्रूव्ह करावा लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
