बुलढाणा: राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही संपन्न झाल्या. निवडणूक काळात प्रत्येक जिल्ह्यात पक्षांतर आणि पक्षप्रवेशाचा धडाका लागला होता. मात्र, आता पुढील काही वर्षे निवडणुका नसल्याने राजकीय पक्षप्रवेशाचं वातावरण शांत आहे. त्यातच, बुलढाण्यातील (Buldhana) काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी शिवसेना आमदार (MLA) संजय गायकवाड यांची भेट घेतल्याने त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती. त्याच, अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बोंद्रे यांची जीभ घसरली. 

Continues below advertisement

चिखलीचे माजी आमदार व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. काल बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल बोंद्रे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राहुल बोंद्रे यांनी महिलांचा नामोल्लेख करत दिलेलं उदाहरण वादाचा मुद्दा बनलं आहे. तुम्ही काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करणार आहात का? या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना राहुल बोंद्रे यांची जीभ घसरली. "जी कुणी महिला असते... जीला दाखवाव लागतं की, मी पतिव्रता आहे. ती मोठं कुंकू लावते आणि मोठे मंगळसूत्र घालते'', असे उत्तर त्यांनी दिले. राहुल बोंद्रे यांच्या या महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

"भाजपवाल्यांची देशभरातील पॉलिसी आहे, त्यांच्याबद्दल चर्चा करत राहायची.. कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करायचा आणि त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायचा. त्यानुसार त्यांची ही सोची समझी चाल आहे, त्यानुसार ते चर्चा करत राहतात. मी एकदाच सांगितलं आहे, परत परत सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. जी कोणी महिला असते.. तिला दाखवावं लागतं किती पतीव्रता आहे, ती मोठ कुंकू लावते, मोठ मंगळसूत्र घालते. प्रत्येकाला तशी आवश्यकता नसते.." असे उदाहरण राहुल बोंद्रे यांनी दिले होते. बोंद्रे यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

Continues below advertisement

महिलांचं जोडे मारो आंदोलन, घोषणाबाजी

चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी महिला संबंधित केलेल्या वक्तव्याचा जिल्ह्यातील महिलांकडून निषेध करण्यात येत आहे. चिखलीतील शिवाजी चौकात महिलांनी राहुल बोंद्रे यांच्या बॅनरला धरुन जोडे मारो आंदोलन केले. चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने चिखली शहरातील शिवाजी चौकात शेकडो महिला एकत्र आल्या. तसेच, राहुल बोंद्रे यांच्या प्रतिमेला जोडे मारत राहुल बोंद्रे विरोधात घोषणाबाजी देखील केली.

हेही वाचा

नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस