Ritu Tawde: मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावण्यात आलेल्या लाल-निळ्या फ्लॅश दिव्यांमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रकरणावरून नियमांचे उल्लंघन होत असल्याची टीका त्यांच्यावर केली जात आहे. 

सोशल मीडियावरील “मुंबईचा शिवसैनिक” या एक्स पेजवरून एक पोस्ट शेअर करत या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये महापौरांच्या वाहनावर पोलिसांच्या वाहनांप्रमाणे लाल-निळे फ्लॅश दिवे लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. “मुंबई महापौर यांच्या वाहनाला पोलिसांसारखे लाल-निळे दिवे लावण्याचा परवाना आहे का?” असा सवालही या पोस्टमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.

Ritu Tawde: नवीन कोऱ्या गाडीवर लावलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद

केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातली होती. व्हीआयपी संस्कृती कमी करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर बहुतांश सरकारी वाहनांवर लाल दिव्यांचा वापर थांबवण्यात आला. मात्र, आता महापौरांच्या नव्या गाडीवर समोर लाल-निळे फ्लॅश दिवे बसवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिवसा देखील पोलिसांच्या वाहनांप्रमाणे हे दिवे लावले जात असल्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ritu Tawde: भाजप सत्तेत आल्यानंतर व्हीआयपी संस्कृती परत येत असल्याची टीका

या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन होत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेत अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता होती. जवळपास 25 ते 30 वर्षांनंतर आता भाजप सत्तेत आल्याने राजकीय वातावरणही तापले आहे. अशा परिस्थितीत भाजप सत्तेत आल्यानंतरही व्हीआयपी संस्कृती पुन्हा डोके वर काढत असल्याची टीका होत आहे.

Ritu Tawde:  महापौरांच्या गाडीवरील लाल दिवे दोन दिवसांपूर्वीच काढले 

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या महापौरांच्या अधिकृत गाडीवरील लाल दिवे दोन दिवसांपूर्वीच काढण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. नियमांचे पालन करत हे दिवे हटवण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सध्या महापौरांच्या गाडीवर कोणतेही विशेष दिवे नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Ritu Tawde: मनगटावरील घड्याळामुळे याआधी रितू तावडे आल्या होत्या चर्चेत

दरम्यान, हे पहिलेच प्रकरण नाही की ज्यामुळे रितू तावडे वादात सापडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मनगटावरील घड्याळामुळेही त्या चर्चेत आल्या होत्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये त्यांनी परिधान केलेले घड्याळ हे महागडे असल्याचा दावा करण्यात आला होता. त्या घड्याळाचे मॉडेल ‘Rolex Daytona येलो गोल्ड डेटोना’ असल्याचे सांगत त्याची किंमत 60 ते 70 लाख रुपये असून भारतात ती एक कोटी रुपयांहून अधिक असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला होता. या दाव्यानंतर सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.

या प्रकरणावर महापौर रितू तावडे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले. त्यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले की, व्हायरल होत असलेली माहिती पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी आहे. त्यांच्या हातातील घड्याळ हे ‘Michael Kors’ कंपनीचे असून ते ‘Rolex Daytona’ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लाखो-कोट्यवधींच्या किंमतीचा प्रश्नच येत नाही. अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा असून हा जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. 

आणखी वाचा 

Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी