मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई (BMC) महापालिकेच्या महापौरपदी अखेर 11 फेब्रुवारीला पदभार स्वीकारला जाणार आहे. तर 7 फेब्रुवारीला अर्ज भरण्याची तारीख आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. कारण ठाकरेंची शिवसेना महापौर (Mayor) आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याचा विचार करत आहे. तशा प्रकारची चर्चा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आणि काही अनुभवी नगरसेवकांमध्ये झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला सहयोगी गटासंदर्भातला निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे, मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक लक्षवेधी आणि चर्चेत आहे. त्यातच, शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही, आमची तयारी सुरू आहे, तुम्हाला लवकरच समजेल असे म्हणत सस्पेन्स कायम ठेवला आहे.
मुंबई महापालिकेच्या निकालानंतर मुंबईचा महौपार कोणत्या पक्षाचा होणार यावरुन चर्चा सुरू होती. त्यावेळी, देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केल्यामुळे महापौरच्या निवडीची जोरदार चर्चा रंगली. आता, महापौरपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाल्याने भाजपचा महापौर होईल हे जवळपास निश्चित मानले जाते. मात्र, शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात येणार असल्याने महापौरपदाचा सस्पेन्स वाढला आहे.
आम्ही उमेदवार देणार की नाही हे तुम्हाला लवकरच समजेल, मी त्याच्याबद्दल आता बोलणार नाही. बीएमसीची निवडणूक होऊन गेली आहे, आता जे महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यावर फोकस करणे गरजेचे आहे. राजकीय विषय बाजूला ठेवा, आमच्या पक्षाची लोक कामाला लागली आहेत, असे म्हणत आदित्य यांनी बीएमसी महापौर निवडणुकीचा सस्पेन्स वाढवला आहे.
हेलिकॉप्टरमधून प्रवाशांना मदत झाली असती
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे ट्रॅफिक जामसंदर्भातही आदित्य ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे. पत्र वगैरे न देता मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यावर आदेश द्यायला पाहिजेत. एमएसआरटीसी कोणाकडे आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे ते मुख्यमंत्र्यांचं ऐकत नसतील. काल जी कोंडी झाली, 32 तास लोक त्यामध्ये अडकले. मंत्रिमंडळातले प्रतिनिधी जे फोटो काढायला पुढे असतात ते काल कुठे होते? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला. तसेच, टोल ऑपरेटरची जबाबदारी तेवढीच आहे की रिफंड द्यावा, नुकसान भरपाई पण द्यावी, अशी मागणीही आदित्य यांनी केली. तर, चौकशी आणि क्लीनचीट ही प्रथा मागील चार वर्षापासून पडलेली आहे. लोकांपर्यंत पोहोचणं असेल किंवा दुसरी लेन सुरू करायची, सोई सुविधा देणं किमान या गोष्टी तरी होऊ शकत होत्या. हेलिकॉप्टर हे मंत्री प्रचारासाठी वापरतात, त्याच्यातूनही मदत झाली असती, असेही आदित्य यांनी म्हटले.
