BMC Election Result 2026 मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल आज जाहीर होत आहे. मुंबईत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी 227 जागांसाठी जवळपास 52.94 टक्के मतदान झालं. मुंबई महापालिकेसाठी जनमतचा एक्झिट पोल समोर आला आहे. त्यानुसार भाजप आणि शिंदे यांच्या युतीला 138 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचवेळी ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 62 जागा मिळतील असं म्हटलंय. दुसरीकडे, काँग्रेस आणि वंचित आघाडीला 20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचवेळी इतर पक्षांना 7 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र मतमोजणीच्या सुरुवातीलच शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT) आणि मनसेने (Raj Thackeray) आघाडी घेतली आहे. ठाकरे बंधूंनी सुरुवातीच्या पहिल्या एका तासात जोरदार मुसंडी मारली आहे. तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटानेही जोरदार सुरुवात केली आहे. (Mumbai Municipal Corporation Election Result 2026)
पहिल्या एका तासात (सकाळी 10.30 पर्यंत) भाजप 10, शिंदेंची शिवसेना 7, शिवसेना ठाकरे गट 12, मनसे 6, काँग्रेस 5, तर इतर 3 जागांवर आघाडीवर आहे. मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 जागांची गरज आहे. हा आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मुंबई महानगरपालिकेत महायुतीला शह देण्यासाठी तब्बल 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले. उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरेंची मनसेने युती केली. ठाकरे बंधूंच्या या युतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला. त्यामुळे मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले. तर दुसरीकडे ठाकरेंचा गड काबीज करण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र्य मैदानात उतरली. तर काँग्रेस आणि वंचितने एकत्र निवडणूक लढवली.