Ramdas Athawale BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपात भाजप आणि शिवसेनेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (रिपाई) एकही जागा सोडण्यात न आल्याने रामदास आठवले प्रचंड संतापले आहेत. महायुतीने (Mahayuti) आपल्यासोबत विश्वासघात केला असून आपण हा अपमान कदापी सहन करणार नाही, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करुन आपल्या संतापाला मोकळी वाट करुन दिली आहे. महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो आहोत.  मात्र, आज जागावाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे, तो निव्वळ विश्वासघात आहे. चर्चेसाठी काल  दुपारी चार वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, मित्रपक्षांकडून त्याचेही पालन करण्यात आले नाही. हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय नसून आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election 2026) तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा हा अपमान मी कदापि सहन करणार नाही. त्यामुळेच आज माझे कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील, तो मला पूर्णपणे मान्य असेल. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून, आज दुपारी 12 वाजता पक्षाचा अंतिम निर्णय आणि भूमिका अधिकृतपणे जाहीर केला जाईल, असे रामदास आठवले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना सोमवारी रात्री भाजप आणि शिंदे गटाकडून जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले. त्यानुसार, मुंबईत भाजप 137 आणि शिंदे गट 90 जागांवर लढणार आहे. रामदास आठवले यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत रिपाईला 16 जागा सोडण्याची मागणी महायुतीकडे केली होती. मात्र, भाजप आणि शिंदे गटाच्या युतीने रामदास आठवले यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवले होते. रामदास आठवले यांनी याबद्दल अनेकदा नाराजीही बोलून दाखवली होती. त्यानंतर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी रामदास आठवले यांच्या वांद्रे येथील संविधान निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी प्रवीण दरेकर यांनी भाजपकडून मुंबईत रिपाईला सन्मानजक जागा सोडल्या जातील, असे सांगितले होते. रिपाई हा महायुतीमधील महत्त्वाचा घटक असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, काल रात्री शिवसेना आणि भाजपचे जागावाटप जाहीर झाले. यामध्ये भाजप 137 आणि शिंदे गट 90 अशी वाटणी करण्यात आली होती. त्यामध्ये रिपाईला सोडण्यात आलेल्या जागांचा कोणताही उल्लेख नव्हता. त्यामुळे आता रामदास आठवले यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर आता भाजप आणि शिंदे गट काय तोडगा काढणार, आपल्या कोट्यातून रिपाईला आयत्यावेळी जागा सोडणार का, हे आता पाहावे लागेल.

आणखी वाचा

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राम कदमांनी भाजपसाठी तिकीट खेचून आणलं, शिंदे गटाच्या उमेदवाराचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, विक्रोळी वॉर्ड क्रमांक 123 मध्ये काय घडलं?