Saamana Agralekh BMC Election 2026: मुंबई भावनिक व भौगोलिक, ऐतिहासिकदृष्टया मराठी माणसाचीच आहे आणि मुंबईवर अमराठी महापौर लादण्याचा प्रयत्न केला तर संयुक्त महाराष्ट्र लढ्याप्रमाणे भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. फक्त पैशांनी मुंबईवर ताबा मिळवता येणार नाही हे भाजपच्या' कृपाशंकर' छाप नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी फोर्टमधील हुतात्मा स्मारकाचा इतिहास समजून घ्यावा, असा हल्लाबोल शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून केला आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी तेव्हा 106 बलिदाने झाली. त्या बलिदानाची परंपरा यापुढेही सुरूच राहील. कृपाशंकर यांचे " मुंबईचा महापौर उत्तर भारतीय असेल " हे वक्तव्य हीच भाजपची अधिकृत भूमिका आहे, पण नकली शिवसेना त्यावर लाचार होऊन सारवासारव करते आहे " मुंबईच्या महापौरांविषयी कृपाभैयाने केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत आहे," असे हे लाचार म्हणत आहेत. (थोडक्यात काय तर आम्ही आतमध्ये' शेपटा' घातला आहे. तो काढता येत नाही) अरे, थुत तुमच्या जिनगानीवर, अशी टीकाही सामना अग्रलेखातून केली आहे.

सामना अग्रलेखात काय काय म्हटलंय? (Saamana Agralekh BMC Election 2026)

भारतीय जनता पक्षाने कृपाशंकर यांच्या मुखातून आपली मळमळ बाहेर काढली आहे. महापालिका निवडणुकीत इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणू की, त्यातून मुंबईचा महापौर उत्तर भारतीय समाजाचा असेल, असे हे कृपाशंकर म्हणाले. कृपाशंकर यांच्या वक्तव्याने मुंबईबाबतचे भाजपचे मनसुबे उघड झाले आहेत. कृपाशंकर हे एकेकाळी काँग्रेसचे नेते होते. उत्पन्नापेक्षा अतिसंपत्ती प्रकरणात त्यांच्यामागे आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीचा ससेमिरा लावला. अवैध मार्गाने जमवलेल्या संपत्तीचा हिशोब त्यांना देता आला नाही. त्यांना अटक होणारच होती, पण प्रथेप्रमाणे कृपाशंकर मुख्यमंत्री फडणवीस यांना शरण गेले व कृपाशंकर यांना स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र देऊन फडणवीसांनी त्यांना भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकले. कृपाशंकर हे भाजपच्या तिकिटावर उत्तर प्रदेशातील जौनपूर लोकसभा मतदारसंघात लढले व त्यांचा दारुण पराभव उत्तर भारतीयांनी केला. म्हणजे जे उत्तर भारतात पराभूत झाले ते मुंबईत उत्तर भारतीय महापौर करायला निघाले आहेत. कृपाशंकर यांनी भाजपच्या तंगड्या भाजपच्याच गळ्यात बांधल्या आहेत. मुळात या निवडणुकीत भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे मुंबईत मराठी-अमराठी वादाची ठिणगी टाकून ते निवडणुका लढू इच्छितात. 

मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई अशा भागांत उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत. यातील मोठा वर्ग बिहार, उत्तर प्रदेशातून मुंबईत आला तो रोजीरोटी कमावण्यासाठी. ते कष्ट करतात व जगतात. कृपाशंकर किंवा त्यांचे नेते स्वतःच्या धोतरातून 'मालपाणी' काढून या वर्गाला पोसत नाहीत, पण हे सर्व हिंदी भाषिक म्हणजे आपले गुलाम आहेत व मुक्या शेळ्या, मेंढयांप्रमाणे आपल्याच मागे येतील, सांगू तिकडे मतांचे शिक्के मारतील या भ्रमात कृपाशंकरसारखे नेते आहेत. मुंबई व आसपासच्या शहरांत हिंदी भाषिक मराठी लोकांत मिळून मिसळून वागतात. त्यातील बहुसंख्य लोकांच्या चार-पाच पिढ्या येथेच आहेत. त्यामुळे त्यांची जन्मभूमी, कर्मभूमी हीच आहे. असे असताना दुधात मिठाचा खडा टाकून नासवानासवी करण्याचा खटाटोप या लोकांनी का करावा? हिंदी भाषिक संकटात असताना उत्तर भारताचे राज्यकर्ते दरवाजे बंद करून बसतात याचा अनुभव मुंबई-महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांनी 'कोरोना' काळात घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जात, प्रांत, भाषा न पाहता सगळ्यांना उपचार व अन्नधान्याची व्यवस्था झाली. उलट जे हिंदी भाषिक उत्तर प्रदेश, बिहारात आपल्या गावी परत गेले त्यांना राज्याच्या वेशीवरच अडवून ठेवले गेले होते. त्यांच्यासाठी स्वतःच्या राज्यांचे, जिह्यांचे, गावांचे दरवाजे भाजप सरकारने बंद केले होते. या सर्व हिंदी भाषिकांना स्वतःच्याच राज्यात जाण्यापासून रोखले होते. दोन-चार दिवस हे लोक अन्नपाण्याशिवाय मुलाबाळांना घेऊन तडफडत होते. तेव्हा ना कृपाशंकर मदतीला धावले ना त्यांना भाजपने मदत केली. आता मोठे आले त्याच उत्तर भारतीयांच्या जिवावर स्वतःची राजकीय पोळी भाजायला! अशा स्वार्थी पुढाऱ्यांना उत्तर भारतीयांनी त्यांची योग्य जागा दाखवायला हवी. 

आदित्यनाथ महाराज, केशव मौर्य, ब्रजेश पाठक, सम्राट चौधरी, मैथिली ठाकूर, मध्य प्रदेश, राजस्थानचे भाजपचे मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या फौजा आता भाजप मुंबईत उतरवणार आहे ते फक्त महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी महापौर होऊ नये यासाठीच. एवढे असूनही महाराष्ट्राचे मराठी मीठ खाणारे सरकार आणि त्यांचे मिंधे या कटबाजीवर तोंड उघडत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन सत्ता भोगणारी अमित शहांची बुटचाटी सेना तर कृपाशंकर यांच्या मराठीद्वेष्टया वक्तव्यावर मूग गिळून बसली आहे. कृपाशंकरच काय, भाजप-मिंध्यांचे शंभर बाप उतरले तरी मुंबईशी मराठी माणसाचे असलेले नाते तोडता येणार नाही. मुंबई भावनिक व भौगोलिक, ऐतिहासिकदृष्ट्या मराठी माणसाचीच आहे आणि मुंबईवर अमराठी महापौर लादण्याचा प्रयत्न केला तर संयुक्त महाराष्ट्र लढ्याप्रमाणे भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. फक्त पैशांनी मुंबईवर ताबा मिळवता येणार नाही हे भाजपच्या 'कृपाशंकर' छाप नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी फोर्टमधील हुतात्मा स्मारकाचा इतिहास समजून घ्यावा. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी तेव्हा 106 बलिदानं झाली. त्या बलिदानाची परंपरा यापुढेही सुरूच राहील. कृपाशंकर यांचे "मुंबईचा महापौर उत्तर भारतीय असेल" हे वक्तव्य हीच भाजपची अधिकृत भूमिका आहे, पण नकली शिवसेना त्यावर लाचार होऊन सारवासारव करते आहे. "मुंबईच्या महापौरांविषयी कृपाभैयाने केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत आहे," असे हे लाचार म्हणत आहेत. (थोडक्यात काय तर आम्ही आतमध्ये 'शेपटा' घातला आहे. तो काढता येत नाही.) अरे, थुत तुमच्या जिनगानीवर, असं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे. (Saamana Agralekh BMC Election 2026)

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO: