Santosh Dhuri and Raj Thackeray: राज ठाकरे साहेबांनी हिरवं रक्त असलेल्या लोकांशी युती केली आहे. या लोकांनी मनसेचा पूर्णपणे ताबा घेतला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आमचा पक्ष त्यांच्यासमोर पूर्णपणे सरेंडर केला आहे, असे वक्तव्य मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी (Santosh Dhuri) यांनी केले. संतोष धुरी यांनी मंगळवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी गळ्यात भाजपचा गमछा घालून त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात टीकेची तोफ डागली. (BMC Election 2026)

मुंबईत मनसेला 52 जागा सोडल्याचे दिस आहेत. मात्र, त्यापैकी सात किंवा आठ सीट निवडून येईल की नाही, याचीही शाश्वती नाही. उद्धव ठाकरे गटाने आम्हाला पाहिजे त्या सीट दिल्या नाहीत. उलट ज्या जागांवर ठाकरे गटाकडे उमेदवारच नव्हते किंवा ज्याठिकाणी त्यांच्या विद्यमान नगरसेवकाचे नाव खराब झाले होते, अशा जागा ठाकरे गटाने मनसेला देऊ केल्या. माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप या मराठा माणसांचा टक्का जास्त असलेल्या भागांमध्ये मनसेची फक्त एका जागेवर बोळवण करण्यात आली. ठाकरे गटाने त्यांना ज्या सीट सोडायच्या होत्या, त्याच मनसेला दिल्या, असे संतोष धुरी यांनी म्हटले. 

ठाकरे गट आणि मनसेत मुंबईत जागावाटप सुरु असताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मनसेला दोन जागा सोडायच्या असे ठरले होते. पण दादरमधील वॉर्ड क्रमांक 190 आणि वॉर्ड क्रमांक 192 आपल्याला मिळणार नाहीत, असे नितीन सरदेसाईंनी मला सांगितले. मी तेव्हाच काय करायचं ते करा पण मला मोकळं करा, असे नितीन सरदेसाई यांना सांगितले. मात्र, वॉर्ड क्रमांक 192 ठाकरे गटाच्या वाट्याला गेला. तो वॉर्डही प्रकाश पाटणकर यांच्याकडून काढून घेण्यात आला. मला जागावाटपाच्या चर्चेत घेतलं नाही किंवा उमेदवारी दिली नाही, याचा राग मला नाही. राज साहेबांनी आम्हाला आधीच भरपूर दिले आहे. पण आमचे नेते संदीप देशपांडे साहेबांना जागावाटपाच्या चर्चेत कुठेही घेतले नाही. ज्यावेळी आम्ही याविषयी विचारणा केली, तेव्हा आम्हाला कळाले की, वरुन असा तह झाला आहे की, राज साहेबांनी संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे दोन किल्ले सरेंडर केले आहेत. हे दोघे उमेदवार म्हणून किंवा जागावाटपात कुठेही दिसणार नाहीत, असा आदेश वांद्र्याच्या बंगल्यावरुन आला होता, असे  संतोष धुरी यांनी म्हटले.

आणखी वाचा

राज ठाकरेंच्या खंद्या शिलेदाराला भाजपच्या कोणत्या नेत्याने गळाला लावलं? संतोष धुरींनी मनसे सोडण्याचं कारण स्पष्टच सांगितलं